गणेश सावंत । बीड
राजकीयदृष्ट्या अतीसंवेदनशील समजल्या जाणार्या बीड जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये ब्लड रिलेशन अॅक्शन मोडवर पहावयास मिळणार आहे. राज्याच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या परळीच्या भाऊ-बहिणीला न.प.च्या निवडणुकीत आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागणार आहे तर बीडमध्ये काका-पुतण्याची लढाई या वेळेस भाऊबंदकीत होणार आहे. तिकडे गेवराईत सोयर्यांच्या राजकीय लढाईमध्ये सख्खे मेव्हणे आमने-सामने दिसणार असून माजलगावात आ. प्रकाश सोळंकेंना आपल्या वारसाचे छत्र पक्के करण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागणार आहे. अंबाजोगाईचे ‘पापा’ कोण? यासाठी मुंदडांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आपले महत्व दाखवून द्यावे लागणार आहे. काठावरच्या धारूरमध्ये व्यक्तिमत्त्वाला अधिक महत्व दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात नगरपालिका, महानगर पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली. यामध्ये बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका होत असून राज्य पातळीवर परळी, बीड नगरपालिकेकडे राजकारण्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहणार आहे. परंपरेनुसार भाऊबंदकी आणि ब्लड रिलेशन असलेले नेतृत्व या निवडणुकीतही आमने-सामने उभे राहणार. परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाऊबहिणींची भाऊबंदकी विकासाच्या मुद्यावर की अन्य कुठल्या मुद्यावर लढवली जाणार हे येणार्या आठवड्यात समजून येणार असलं तरी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना ही निवडणुक विधानसभेपेक्षा जास्त आव्हानात्मक ठरणार आहे. विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री धनंजय मुंडेंनी गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात परळी शहरातला विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना थेट महत्व दिल्याने परळी शहर धनंजय मुंडेंना आपलसं करून या निवडणुकीचा निकाल देईल, असे जाणकारांचे सांगणे आहे. दोन्ही भाऊ-बहिण हे राज्याच्या राजकारणात प्रभावशील असल्यामुळे या निवडणुकीकडे उभ्या राज्याचे लक्ष लागून आहे. बीडमध्ये 2019 च्या निवडणुकीत काका-पुतण्याची लढाई उभ्या महाराष्ट्राने पाहिली. त्यात पुतण्या काकावर भारी राहिला. तत्पुर्वी आघाडीच्या नावाखाली पुतण्याने नगरपालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवताना 20 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले. त्याचा फायदा संदीप क्षीरसागरांना आमदार होताना दिसून आला. मात्र गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात संदीप क्षीरसागरांच्या गोटातले असंख्य नगरसेवक पुन्हा काकाच्या छत्रछायेखाली गेल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची ठरेल, असे चित्र एकीकडे असतानाच काकांकडून थेट योगेश क्षीरसागरांना या निवडणुकीत उतरवल्याने काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंदकीच्या लढ्यात पहावयास मिळणार आहे. आ. संदीप क्षीरसागरांना सोडून गेलेल्या नगरसेवकांमुळे उद्याच्या निवडणुकीत जसे आव्हान स्वीकारावे लागणार आहे तसे विचाराचा पिंड नसलेल्या शिवसेना पक्षात डेरेदाखल झालेल्या क्षीरसागरांना या निवडणुकीला सामोरे जाताना हिंदुत्वाला सोबत घ्यावे लागणार त्यामुळे सेक्युलर मतदार डावलतील का? याचा विचार जयदत्त क्षीरसागरांसह डॉ. भारतभूषण क्षीरसागरांना करावा लागणार आहे. त्यात शिवसेनेची झालेली वाताहात, शिंदे-ठाकरे गट याबाबत उघड न घेतलेली क्षीरसागरांनी भूमिका हेही या निवडणुकीत महत्वाचं ठरणार आहे. त्यात क्षीरसागरांच्या या राजकीय वर्चस्वाला छेद देण्यासाठी आ. विनायक मेटेंपासून ते सुरेश नवलेंपर्यंत वेगळी मोट बांधण्याच्या तयारीत दिसत आहेत. भाजपाने अद्याप तरी आपले पत्ते या निवडणुकीबाबत समोर काढले नसले तरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे नेतृत्व स्वीकारत न.प.च्या लढाईत सहभागी होतीलच हे सांगणे कठीण आहे. गेवराईमध्ये सोयर्यांच्या लढाईत पंडितांना विधानसभेसाठी आपलं महत्व दाखवून द्यावं लागणार आहे. विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या ताब्यात गेवराईची नगरपालिका असून शहरामधून पवार हे मतांमध्ये पंडितांपेक्षा वरचढ ठरलेले दिसतात. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून विजयसिंह पंडितांनी शहरावर आपला प्रभाव राहावा यासाठी गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात बरेच बदल घडवले. मात्र तरीही आ.पवारांचं नेतृत्व स्वीकारणारा गेवराईकर उद्याच्या निवडणुकीत सोयर्यांच्या लढाईमध्ये पवारांचं छत्र धरतं की, पंडितांचं छत्र हे येणारा काळ सांगणार आहे, परंतु इथली सोयर्यांची लढाई जिल्ह्यासाठी महत्वाची ठरणार आहे. माजलगाव नगर-पालिकामध्ये आ. प्रकाश सोळंकेंना आपला वारसा हक्क प्रभावशाली करण्यासाठी नगरपालिका स्वत:च्या ताब्यात असणं महत्वाचं वाटणार, यात गैर नाही. परंतु त्यांना या निवडणुकीमध्ये साहल चाऊसपासून ते भाजपाच्या मोहन जगतापांपर्यंत हाबूक ठोकणारे अनेकजण भेटणार आहेत. इकडे धारूर नगरपालिका निवडणुकीत सातत्याने व्यक्तिमत्वाला अधिक महत्व दिलेले आहे.