गणेश सावंत
लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात सर्वसामान्यांच्या जान आणि मालची जबाबदारी ही शासनआणि प्रशासन व्यवस्थेची असते. संविधानाने दिलेल्या अधिकारासह स्वातंत्र्याच्या परिपाठात शासन चालवण्यासाठी जे जे लागते ते ते सर्वसामान्यातील सर्वसामान्य आपल्या हातून खरेदी केलेल्या वस्तूच्या करातून सरकारला पाठबळ देत असतो. सुईच्या टोकापासून सोने-हिर्याच्या खरेदीपर्यंत प्रत्येक माणूस शासनाला करापोटी दोन पैश्यापासून कोट्यवधी रुपयांपर्यंत कर देत असतो. अशा वेळी त्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसावर जेव्हा आर्थिक, सामाजिक, नैतिक अथवा नैसर्गिक संकट येते तेव्हा त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासन व्यवस्थेसह सरकारने सर्वोत्तर मदत ती सर्वसामान्यांना करायलाच पाहिजे, परंतु गेल्या पाच-सात वर्षांच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांना कित्येक मल्टिस्टेटसह अन्य बँकांनी अक्षरश: आर्थिकदृष्ट्या नागवे केले. या प्रकरणात कित्येक गुन्हे दाखल झाले, मात्र त्यातून सर्वसामान्यांचे लुटले गेलेले पैसे अद्याप मिळालेच नाही. हा शासन व्यवस्थेचा नाकरतेपणाच. जिल्ह्यात मल्टिस्टेट म्हणजे
लुबाडुंची टोळी
अशी काहीशी बँकांबाबत धारणा झाली आहे. गेल्या सात ते दहा वर्षाच्या कालखंडात एक नव्हे दोन नव्हे बारापेक्षा जास्त मल्टिस्टेट, बँका बंद पडल्या. संचालक मंडळ अथवा त्या बँका चालवणारा अध्यक्ष पळून गेला. या प्रकरणात लाख-पन्नास नव्हे, कोट-दोन कोट नव्हे हजारो कोटी रुपयांचा चुना सर्वसामान्य माणसांना लावण्यात आला. टक्का दोन टक्क्याची व्याजाची लालूच जिल्ह्यातल्या वाडी-वस्तीपासून गावागावातल्या लोकांना आर्थिकदृष्ट्या नागवी करून गेली. सर्वसामान्य माणसांनी पोटाला चिमटे घेत जे पैसे जमा केले ते पोरांच्या भविष्यासाठी कुणाला शिक्षणासाठी हवे होते, कुणाला लग्न कार्यासाठी हवे होते तर कुणाला वृद्ध माता-पित्यांचे, भाऊ-बहिणींचे वैद्यकीय उपचार करायचे होते, परंतु आपला पोट हा पुर्ण झाला अथवा आपल्याला हवे तेवढे पैसे जमा झाले की संबंधित मल्टिस्टेट अथवा बँक चालक रात्रीतून गाशा गुंडाळून पळून गेला. त्यावर ओरड झाली, गुन्हेही दाखल झाले, मात्र शासन-प्रशासन व्यवस्थेने ठेवीदारांच्या ठेवी आजपावेत परत देण्यासाठी कुठल्याच हालचाली केल्या नाहीत. जेवढ्या मल्टिस्टेट लुटारुंच्या टोळ्या बनल्या तेवढीच
व्यवस्था लबाड
बनल्याचे चित्र गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात जिल्हावासी पाहतोय. गेल्या दोन वर्षातलं जितंजागतं उदाहरण पहायचं झालं तर बीड शहरातील जिजाऊ माता मल्टिस्टेट, राजस्थानी मल्टिस्टेट, साईराम, ज्ञानराधा, लक्ष्मीमाता यासह बीड, परळी, माजलगाव, गेवराई सह अन्य तालुक्यातल्या मल्टिस्टेट बंद पडल्या. यामध्ये कुणाकडे पंधरा-वीस कोटींच्या ठेवी तर कुणाकडे हजारो कोटींच्या ठेवी लोकांनी ठेवल्या. रात्रीतून बंद पडलेल्या मल्टिस्टेटमुळे कुणाचे विवाह कार्य पुढे ढकलले गेले, कुणाचे शिक्षणाचे वाटोळे झाले तर कुणी वैद्यकीय उपचाराअभावी थेट सरणावर गेला. अनेकांना हृदयविकाराचा त्रास सुरूझाला. याबाबत पैसे मिळावेत म्हणून ठेवीदारांनी उपोषणे केले, आंदोलने केली, निवेदनही दिले मात्र शासन-प्रशासन व्यवस्थेने सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाचे पैसे मिळावेत यासाठी कुठलेच प्रयत्न केले नाहीत. या उलट गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या लबाडांना आणि घोटाळेबाजांना तात्काळ पकडून मुसक्या बांधत त्यांना फरफटत जेलमध्ये टाकायला हवे होते, त्यांना आजपावेत जेलमध्येही टाकण्यात आले नाही. विशेष म्हणजे लोकांची ओरड मोठ्या प्रमाणावर असताना पोलीस प्रशासनाने आरोपींचा शोध घेत मुसक्या आवळणे अपेक्षीत होते मात्र
तपासी पोलीसच लाचखोर
निघाले. जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या नेतृत्वात काम करणारे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे आणि त्याचा साथीदार जाधवर यांच्या टीमला सर्वसामान्यांच्या पैशावर डल्ला मारणार्या तथाकथीत बँक चालकाच्या मुसक्या बांधत सर्वसामान्य माणसाची पैना पै परत करण्याची जबाबदारी होती. मात्र झालं उलट ‘तुम्हाला अटक करणार नाही, तुमची अटक लांबवतो, गुन्हा दाखल करणार नाही, यासाठी हा हरीभाऊ खाडे आणि जाधवर खाकीलाच गुन्हेगाराच्या सेजवर निजवायचे आणि त्यावर भाड खायचे. या खाडेची मजल इथपर्यंत गेली की, पाच-पन्नास अथवा लाख-पन्नासाची लाच न मागता तब्बल एक कोटीची लाच मागितली. त्यात खाडेचा भ्रष्टाचारीपणा उघडकीस आला आणि त्याच्या घरात एक कोटीपेक्षा जास्त रुपयांची नगदी रोकड, सोन्याचे बिस्किटे, चांदीच्या विटा मिळून आल्या. तेव्हा आर्थिक गुन्हे शाखा ही ठेवीदारांसाठी काम करत नव्हती, तर केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी आणि चोरावर मेार होण्यासाठी काम करत असल्याचे दिसून आले. जेवढ्या पद्धतीने मल्टिस्टेट आणि त्याचे संचालक मंडळ या प्रकरणात गुन्हेगार आहेत तेवढ्या पद्धतीनेच या गुन्हेगारांना हप्ते घेऊन मदत करणारे लाचखोर पोलीसही गुन्हेगार म्हणावे लागतील. लाज-लज्जा, शरम वेशीला गुंडाळून यंत्रणाच जेव्हा नरकडी करते तेव्हा साहजिकच
संतापाची लाट
उसळून येते. आज पै पै करून बँकेत पैसे जमा केले खरे परंतु ते मल्टिस्टेटवाल्यांनी लुटून नेले आणि त्या लुटारूंना पकडण्यापेक्षा बीडची पोलीस यंत्रणा त्या लुटारूंकडून लाच घेते, हप्ता घेते हे जेव्हा ठेवीदारांसह जिल्हावांसियांच्या लक्षात आले तेव्हा पोलीसांविरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला. पोलिसांच्या कार्यपद्धतीवरआणि पोलीस अधिकार्यांच्या लाचखोरीवर स्पष्टपणे बोलले जाऊ लागले. गोरगरीबांची हाय थेट पोलीस अधिकार्यांनाच लागेल, असा शापही देण्यात येऊ लागला. लोकांच्या प्रतिक्रियेने अथवा शापाने काय होईल हे सांगता येत नसले तरी पोलिसांची गेलेली इज्जत त्यातही जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचा हा बीडमधील कार्यकाळ भविष्यात ठाकुरांना अस्वस्थ करून सोडेल, त्यांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार्यांना आपल्या कार्यकाळात सवलत ठेवली ती ठाकुरांना नक्कीच झोपू देणार नाही. म्हणून आम्ही ठाकुरांनाआवाहन करतो, अजून वेळ गेलेली नाही, लोकांच्या घामाचे पैसे लुबाडणार्यांना जेलमध्ये टाका, आणि सर्वसामान्यांचे
पैसे कसे देता येतील ते पहा
ज्या ज्या मल्टिस्टेटचे अध्यक्ष आणि संचालक फरार असतील त्यांच्या मुसक्या तात्काळ बांधा, आम्हाला खात्री आहे, बीडच्या पोलीस यंत्रणेला फरार झालेला एक ना एक आरोपी कुठे आहे, याची इत्यंभूत माहिती आहे. आता थोडंसं लाचखोरीसाठी वापरलेलं इमान पोलीस यंत्रणेने बाजुला ठेवावं. स्वत:ला माणूस म्हणून आणि स्वत: खाकी परिधान करताना घेतलेल्या शपथेला आठवून या सर्वांना जेलवारी करत त्यांच्या मालमत्तेवर टाच आणत सर्वसामान्यांचे पैसे कसे देता येतील याकडे लक्ष द्यावे. मग पहा सर्वसामान्यांसाठी केलेलं एक चांगलं काम सुखाचे आणि समाधानाची झोप कशी देईल. लोक प्रचंड त्रस्त आहेत, लोकांच्या आयुष्याची जमा पुंजी या लबाडांनी लुटून नेली आहे. अशा संकटाच्या काळामध्ये जो धावून येतो तो त्या त्या संकटात अडकलेल्या माणसासाठी देव असतो. मग तुम्ही देव बनणार ना.