गणेश सावंत
सत्याला असत्य, अन्यायाला न्यायात, बेकायदेशीरला कायदेशीर करणे हाच आमचा नौकर धर्म असल्यागत आज प्रशासन व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी काम करतात. सत्य, न्याय आणि कायदा यावर सर्रासपणे बलात्कार करणारे नराधम कोणी असतील तर ते प्रशासन व्यवस्थेतील अधिकारीच. गेल्या आठवडा-पंधरा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात ज्या काही ठळक घटना घडल्या त्या घटनातून सत्य-न्याय आणि कायद्याला इथे स्थान आहे की नाही, हा प्रश्न कुणच्याही सर्वसामान्य माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीतील अनागोंदी आणि एकअंगी कारभार म्हणा, वाहतूक व्यवस्थेतल्या बोजवार्यातून घडलेले एक प्रकारचे हत्याकांड म्हणा, किंवा बेकायदेशीरपणे उभारलेल्या जाहिरात फलकातून मृत्यूचे झालेले तांडव म्हणा, या सर्व घटना शासन व्यवस्थेतील व्हाईट कॉलर आणि प्रशासन व्यवस्थेतील अधिकार्यांची लाचखोरीची झालर या सर्व रक्तपातास जबाबदार मानता येईल. इथं
व्यवस्थेचा बाप पैसा
असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे श्रीमंती आहे तो मनी-मसलच्या जोरावर सत्य-न्याय आणि कायद्याला आपल्या खिशात वागवू शकतो. आठवडाभराची पुण्यातील ती अपघाताची घटना जितकी भयान होती त्यापेक्षा त्या घटनेच्या घटनाक्रमाला बदलू पाहणार्यांची रणनीती अत्यंत भयंकर होती. पैशावाल्याच्या घरात जन्मलेल्या पोट्ट्याने अख्खं पुणं आपल्या बापाची जहागीर असल्यागत ज्या पद्धतीने बापाने दिलेल्या गाडीतून बेदरकारपणे एका तरुणाला आणि एका तरुणीला चिरडून टाकले त्या दोघांचे रक्त पुण्याच्या रस्त्यावर पडले तेव्हा हा पैशावाल्याचा दिवटा मद्यधूंद अवस्थेत होता. अपघात घडल्यानंतर पोलिसांना त्याची माहिती झाली, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो या गुन्ह्यात कसा अडकणार नही? इथपासून ते त्याला पिझ्झा, बर्गर खाऊ घालण्यापर्यंत खाकी निलाजरी झाली, यापेक्षाही व्यवस्थेच्या निर्लज्जपणेचा कळस तेव्हा झाला जेव्हा न्यायदेवतेनेच आपल्या डोळ्यावर पट्टी बांधत या दिवट्या पोट्ट्याला एक पान निबंध लिहिण्याची शिक्षा देत जामानी दिला. तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले. मग इथं श्रीमंत होणं महत्वाचं आहे का? पैसा असणेच गरजेचं आहे का? सत्य, न्याय, आणि कायदा हे केवळ पैशावाल्यांच्या सेजेवरच्या ललना झाल्यात का? न्याय देवतेने जेव्हा स्वत:चेच लक्तरे निबंधाच्या शिक्षेतून वेशीला टांगले तेव्हा
तेथे न्याय कैसा?
हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राने उपस्थित केला. स्वाभिमान जपणार्या महाराष्ट्राला जेव्हा या घटनाक्रमातून सत्य-न्याय आणि कायद्यावरच बलात्कार होतो हे लक्षात आलं तेव्हा महाराष्ट्र उसळला, व्यक्त होऊ लागला, प्रतिक्रिया देऊ लागला, तेव्हा कुठं शासन व्यवस्थेत बसलेल्यांचा व्हाईट कॉलरला हे प्रकरण अंगलट येतय असं वाटू लागल्याने या प्रकरणात लक्ष घालत त्या दिवट्यावर दुसर्यांदा गुन्हा दाखल केला. यापेक्षा अतिरेक त्याच्या बापाचा आणि त्याच्या आजोबाचा जेव्हा समोर आला तेव्हा पैशाची मस्ती आणि माज काय असते हे या अग्रवाल कुटुंबाने महाराष्ट्राला दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हरला अपघताचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी पैशाचे आमिष दाखविण्यापासून ते त्याला डांबून ठेवण्यापर्यंतची मजल या कुटुंबियाची गेली. यापुढे जात या पोट्ट्याच्या बापाने आणि आज्याने हे प्रकरण दाबल्यासाठी जो जो पैशाचा माज दाखवला तो महाराष्ट्रासमोर आला. अखेर पैशावाल्याच्या सेजेवर ललना होऊन पडणार्या सत्य-न्याय आणि कायद्याला सरशेवटी सन्मानाची वागणूक मिळाली आणि मितीला रस्त्यावरून जाणार्या दोन निष्पापांचा जीव घेणार्या अग्रवाल कुटुंबियाच्या तीन पिढ्या जेलमध्ये जाऊन बसल्या. इथं एकट्या अग्रवालांचा विषय नाही, तर इथं विषय आहे तो
लाचखोर व्यवस्थेचा
शासन-प्रशासन व्यवस्था जेव्हा पैशावाल्यांपुढे लाचेच्या सेजेवर कपडे काढून निजते तेव्हा अशा घटना घडतात आणि नाहक त्यात निष्पापांचे जीव जातात. गेल्या पंधरवाड्यातली आपण घाटकोपरची घटना पाहिली तर त्या घटनेमध्ये ज्या 17 लोकांचा जीव गेला तो जाहिरात फलक कोसळल्याने. परंतु 250 टनापेक्षा अधिक लोखंड वापरलेल्या या फलकाची जागा जेव्हा तयार केली जात होती तेव्हा व्यवस्थेच्या डोळ्यात नेमके काय गेले होते? महानगरपालिकेपासून राज्य शासन नेमके काय करत होतं? बेकायदेशीरपणे ते फलक लावण्यात आले होते. तर मग त्यावर कारवाई का करण्यात आली नव्हती? परंतु हमाम मे सब नंगे असल्यागत इथे शासन आणि प्रशासन व्यवस्था आणि त्या व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी राज्याशी आणि राज्यातील रयतेशी इमान न राखता पैशासाठी जेव्हा कपडे काढतात तेव्हा बीडसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात
खाडेसारखे अधिकारी जन्मतात
ठेवीदारांचे पैसे लुटलेल्या बँकांना सुतासारखं सररळ करण्यासाठी आणि त्यांच्याकडून वसुली करून गोरगरीब लोकांचे पैसे वापस मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक गुन्हे शाखेची स्थापना केली. त्या शाखेचा बीड पोलीस दलातला पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे जेव्हा कोटीची लाच मागतो आणि त्याच्या घरात चांदीच्या विटा, सोन्याची बिस्कीटे आणि नगदी एक कोटीची रोकड सापडते तेव्हा लाचखोरीची ही विषवल्ली पचवणार्याची पैदास गल्ली ते दिल्ली वड्यावगळीगत पहायला मिळतं, गेल्या सहा दिवसांच्या कालखंडामध्ये अशा पैदासी बीड जिल्हा प्रशासनात नऊ मिळून आल्या. या तिन घटनाक्रमांवरून शासन आणि प्रशासन व्यवस्थेत पैशाच्या बळावर चालणारी लांडी लबाडी, लाचखोरी किती पुढारलेली आहे, अशा लाचखोरांना जगद्गुरू संत तुकोबा थेट सांगतात
तुका म्हणे गाढव लेका
जिथं दिसेल तिथं ठोका
आम्हाला तर आता स्पष्टपणे म्हणावसं वाटतं, जिथं सत्य नसेल, जिथे न्याय नसेल जिथे कायद्यावर बलात्कार होत असेल तिथे तिथे सर्वसामान्यांनी आवाज उठवावा. कायद्याने दिलेला आपला अधिकार कोणी हिसकावत असेल तर त्याला हिसका दाखवावा, कारण शासन आणि प्रशासन व्यवस्थेत जेव्हा अन्यायाशी राजा जरी न करी दंड ।
बहुच ते लंड पिडती जना ।
अन्यायाविरोधात राजा म्हणजेच आजचे सत्ताधारी दंड करत नसतील तर ते गुंड जनतेला जास्तीत जास्त पिळतील, त्रास देतील म्हणूनच तुका म्हणे ऐश्या नरा मोजुनी माराव्या पैजरा या स्थितीत आता सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाने राहायला हवं, आवाज उठवायला हवा, जर पुण्यातून आवाज उठला नसता तर पैशावाल्या अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा बाहेर आला नसता, लाचखोर खाडेसारखा भ्रष्टाचारी बीड जिल्ह्याला समोर दिसला नसता तेव्हा उठा ‘व्यवस्थेचा बाप पैसा तेथे न्याय कैसा’ या प्रश्नावर अडून न राहता ‘सत्य-असत्याशी मन केली ग्वाही, मानलिय नाही बहुमता’ या भूमिकेत राहत तुका म्हणे, गाढव लेका जिथे दिसेल तिथे ठोका या भूमिकेत सर्वसामान्यांनी राहावे.