आ. क्षीरसागरांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांचा प्रश्नांचा भडीमार, चाहेचार वर्षे काय केले? रस्ते, नाल्या, पाण्याचा प्रश्न तेव्हा दिसला नाही का? एखादं जनआंदोलन का उभं केलं नाही? स्वत: उपोषण तरी करायचं? या प्रश्नावर आ.क्षीरसागर निरुत्तर
बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिकेकडील वीज कंपनीचे 36 कोटी रुपये देण्यासाठी डीपीडीसी सहकार्य करत नसल्याची ओरड आ. संदीप क्षीरसागरांनी आज पत्रकार परिषदेत करताच पत्रकारांनी आ. क्षीरसागरांवर प्रश्नांचा भडीमार करत गेली साडेचार वर्षे तुम्ही काय करत होते? आज विधानसभा निवडणुका जवळ आल्या की, जाग आला का? आजच तुम्हाला शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, यासह सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा दिसून आल्या का? असे एक ना अनेक प्रश्न विचारताच आ. क्षीरसागरांना या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. गडबडून जात सारवासारव करताना हे काय, गेल्या आठ महिन्यांपासून कोर्टात झटतोय, कोर्टाने निर्णय दिला आहे मात्र बीड प्रशासनाकडून त्याची अमलबजावणी केली जात नाही, असे म्हटले असले तरी अडीच ते तीन लाख जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्या आ. क्षीरसागरांना गेल्या साडेचार वर्षात या प्रश्नावरून साधं जनआंदोलन उभा करता आलं नाही. अथवा स्वत: या प्रश्नासाठी उपोषणाला कुठे बसल्याचे ऐकण्यात नाही. ही सर्व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नौटंकी असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी अभुतपूर्व बदल केला अन् आ. संदीप क्षीरसागरांना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मात्र पाच वर्षांच्या कालखंडात काहीकाळ सत्तेत असलेले आ. क्षीरसागर यांना बीडसाठी काहीच करता आले नाही, मोठ्या योजना आणता आल्या नाहीत, अथवा मी काहीतरी करून दाखवलं, अशी वास्तूही उभारता आली नाही. आता लोकसभा निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आहे, अशा स्थितीत मतदारसंघाची आणि मतदारसंघातील जनतेची आठवण नव्हे नव्हे तर कणवळा आ. क्षीरसागरांना येऊ लागला आणि त्यांनी बीड नगरपालिकेकडे वीज कंपनीचे जे 36 कोटी रुपये थकलेले आहेत ते भरण्यासाठी कोर्टाच्या आदेशानंतरही डीपीडीसीतून प्रयोजन केले जात नसल्याबाबतची ओरड करण्या हेतू आमदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं सध्या बीड शहराची लोकसंख्या अंदाजे तीन लाख आहे. बिंदुसरा, माजलगाव धरणातून बीडला पाणीपुरवठा होत आहे, अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात 95 टक्के एवढे झाले आहे. केवळ वीज कंपनीचे नगरपालिकेकडे 36 कोटी थकलेले असल्याने वीज कनेक्शन अभावी बीड शहराला 15 दिवसाआड पाणीपुरवठा मिळत आहे. प्रशासनाचे आणि शासनाचे जाणीपुर्वक या मतदारसंघावर दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी पत्रकारांनी गेली साडेचार वर्षे तुम्ही काय केचलं? रस्त्याचे प्रश्न तेव्हा तुम्हाला दिसले नाहीत का? शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा,घाण आहे. यावर तुम्ही कधी भाष्य का केले नाही? जनआंदोलन का उभं केलं नाही. जनतेला सोबत घेऊन मोर्चा का काढला नाही? तुम्ही स्वत: उपोषणाला बसलात का? आता निवडणुका आल्यात म्हणून तुम्ही हे करताय का? असे एक ना अनेक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर एकाही प्रश्नाचं उत्तर आमदार क्षीरसागरांना देता आलं नाही. त्यांनी गोंधळून जात कागद पुढे करत हे काय आम्ही कोर्टात भांडतोय, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.