बीड/परळी (रिपोर्टर): शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर खांडेंविरोधात मुंडे समर्थकात प्रचंड संताप दिसून येत आहे. खांडे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी परळीत वाल्मिक कराड यांच्या फिर्यादीवरून खांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बीडमध्ये सचीन जाधव यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. कुंडलिक खांडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत एकेरी भाषेचा उल्लेख केला. त्याचबरोबर मराठा-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्ये केले आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याबाबत कट रचला. म्हणून जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरून खांडेंविरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 505 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मराठा आंदोलक जरांगे यांच्या विरोधात एकेरी शब्दाचा प्रयोग करत बीडमधून मुस्लिम समाज जरांगेंसोबत जात नाही, नुसत्या मराठ्यांच्या मतांवर आमदार होता येत नाही, जरांगे यांचा उमेदवार निवडून येत नाही, असं म्हणत जरांगे माझ्याकडून उभा राहा म्हणून माझ्या मागे लागले आहेत, अशा भाषेत वक्तव्ये करत मराठा व मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्ये केले. दुसर्या एका ऑडीओ क्लिपमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचे वक्तव्ये केले असून राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचेही त्या ऑडीओ क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशीच भाषा त्यामध्ये असल्याची फिर्याद सचीन जाधव यांनी पेठ बीड पोलिसात दिली आहे. त्यावरून कुंडलिक खांडेंवर गुन्हा दाखल झाला आहे तर दुसरी तक्रार ही परळी पोलिसात देण्यात आली असून ती तक्रार थेट वाल्मिक कराड यांनी दिली आहे. ते आपल्या तक्रारीमध्ये म्हणतात, कुंडलिक खांडे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडीओमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे व माझ्याबाबत खालच्या पातळीने बोलत शिवीगाळ स्पष्ट ऐकण्यास येत आहे. त्याचबरोबर ना. धनंजय मुंडे यांची गाडी फोडून ‘त्याला ठोका, एक दगड 50 हजाराने देऊन दोन कोटी खर्च करू’ अशी धमकी दिली म्हणून खांडेंविरोधात परळी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिप व्हायर झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांचे काल कार्यालय फोडण्यात आले होते. आज त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
दहीफळ वडमाऊलीत खांडेंचा पुतळा जाळला
लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला, माझ्या गावातून लिड दिली मात्र सर्कलमधील सर्व बुथ बजरंग बप्पाला दिले. यासह अन्य वादग्रस्त वक्तव्ये असलेल्या तीन क्लिप काल व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याबाबत मुंडे समर्थकात संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी खांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील कार्यकर्त्यांनी खांडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीही केली.