मुंबई (रिपोर्टर): गेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले. महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन उमेदवार जिंकले तर शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असणारे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची 7 मतं फुटल्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचा दावा ठाकरे गटानं केला आहे. त्यासंदर्भात आता स्वत: जयंत पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी शरद पवार गटाचीही पूर्ण 12 मतं आपल्याला मिळाली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. बारापैकी एक मत फुटलं असून हे मत कोणाचे? याबाबत बीडमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
जयंत पाटील यांना विधानपरिषद निवडणुकीत 12 मतं मिळाली. ही 12 मतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या 12 आमदारांची असल्याचा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे शरद पवार गटानं आपली पूर्ण ताकद त्यांच्या पाठिशी उभी केल्याचंही सांगितलं गेलं. पण आता खुद्द जयंत पाटील यांनीच शरद पवार गटाची सर्व बारा मतं आपल्याला मिळाली नसल्याचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मी पराभवाचं आत्मचिंतन करत आहे.महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण आधी नव्हतं. थोडंफार इकडे-तिकडे व्हायचं. मी निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असं घडत असेल तर जनतेनं दोन्ही सभागृहं कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.मी राष्ट्रवादीच्या 12 मतांवर उभा होतो. त्यातलं एक मत फुटलं. आमचीही मतं फुटली. मला जर चार मतं मिळाली असती, तर दुसर्या पसंतीच्या मोजणीत मी 25 ते 30 मतं आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं, असं म्हणत शरद पवार गटाची पूर्ण 12 मतं आपल्याला मिळाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली दुनियेची मतं फुटली तर त्यांच्या एका मताचं काय घेऊन बसलात? अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.