तुम्ही साद घातली आम्ही साथ दिली
मुस्लीमांच्या नशिबी अविश्वासाची धूळ आली
बीड (रिपोर्टर): जेव्हा केव्हा शरद पवार अडचणीत आले, तेव्हा तेव्हा बीडकरांनी शरद पवारांच्या सादेला हो देत साथ दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला बीडकरांनी डोळे झाकून मतदानरुपी आशिर्वाद दिला. या आशिर्वादातले सर्वाधिक हात हे मुस्लिम समाजाचे होते. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात शरद पवारांच्या आमदार संदीप क्षीरसागरांनी मतदारसंघाचेच नव्हे तर बीड शहराचे वाटोळे केले. स्वत: विकास केला नाही आणि दुसर्याने विकास कामे आणले तर ते स्वअधिकाराच्या बळावर वेळोवेळी आडवले. जसे संदीप क्षीरसागरांनी मतदारसंगातील जनतेच्या अपेक्षांचा भंग केला तसे थेट शरद पवारांनीही मुस्लिम समाजाच्या अपेक्षांचा भंग करत मुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळ खेळल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
2019 च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या शब्दावर मुस्लिम समाजाने संदीप क्षीरसागरांना निवडून दिले. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात संदीप क्षीरसागरांनी मुस्लिम मोहल्ल्यात सोडा मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी रस्तेही करता आले नाहीत. जो विश्वास संदीप क्षीरसागरांवर केवळ शरद पवारांच्या आवाहनाखातर टाकला होता त्या विश्वासाचा घात झाला. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे म्हणणारे शरद पवारांनी गेल्या काही वर्षांच्या कालखंडात राज्यपातळीवर ज्या घटना घडल्या त्यावरही स्पष्ट भाष्य केले नसल्याचे वेळोवेळी दिसून आले. रामगिरी महाराजांची भूमिका, नितेश राणे वक्तव्ये यावर काहीच भाष्य पक्षाकडून केले गेले नाही. केवळ शरद पवारांची साद ही मुस्लिमांची मते घेण्यासाठीच असते. मुस्लिम समाज शरद पवारांना साथ इमानदारीने देतो. मात्र पवारांकडून वेळोवेळी मुस्लिम समाजाचा घात होतो. अशी उघड चर्चा समाजात होत आहे. मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी शरद पवारांकडून मुस्लिम उमेदवार देणे अपेक्षित होते. मात्र जो उमेदवार आष्टीत दिला तोही दुबळा दिला. बाबाजानी दुर्रानी सारखा अथवा अन्य कोणा वैचारिक मातब्बराला संधी दिली असती तर तो समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडू शकला असता असे स्पष्टपणे मुस्लिम समाजातून बोलले जात आहे. बीडमध्ये तर शरद पवारांचा उमेदवार हा थेट पाच वर्षानीच आमच्या दारात पुन्हा मते मागण्यासाठी येत असल्याच्या प्रतिक्रियाही मुस्लिम समाजातून व्यक्त होत असून साहेब तुम्ही जेव्हा केव्हा साद घातली तेव्हा तेव्हा आम्ही साथ दिली. तुम्ही मात्र मुस्लिम समाजाच्या अपेक्षांना धूळ चारली, असं म्हणत मुस्लिम समाज शरद पवारांसह उमेदवारावर प्रचंड नाराज असल्याचे आता दिसून येऊ लागले आहे.












