सांगली (रिपोर्टर): विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याने महायुतीने जोरदार कंबर कसली आहे, तर महाविकास आघाडीने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठा पेच हा जागा वाटपाचा असणार आहे. महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. जागावाटपाच्या चर्चेपूर्वी ठाकरे गटाने नाशिकमध्ये आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर झाला असून, नाशिक पश्चिम मतदार संघातून सुधाकर बडगुजर तर मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. यामुळे मविआमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. आत महाविकास आघाडील शरद पवार गट आणि काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल रंगशारदा येथे शिवसैनिकांचा मेळावा घेत विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. मात्र आज नाशिकमध्ये उमेदवार जाहीर झाल्याने राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शरद पवार गट आणि काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याजवळ नाराजी व्यक्त करणार असल्याचे बोलले जात आहे.