बीड (रिपोर्टर): गेले दोन दिवस बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतातील बाजरी, सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही ठिकाणी जमिनीसह पिके वाहून गेलेले आहे तर बीड जिल्ह्यात एका व्यक्तीचा पुरात वाहून मृत्यूही झाला आहे. शेतकर्यांची चौदा जनावरे दगावलेली आहेत. 27 घरांची पडझडही झाली आहे. याबाबत महसूल विभागाचे तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्याकडून पंचनाम्याला सुरुवातही झाली आहे.
बीड जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील 61 महसूल मंडळांपैकी 31 महसूल मंडळात सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यातील अकराही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यामध्ये बाजरी, सोयाबीन, कापूस ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. काही ठिकाणी मातीसह शेती वाहून गेलेली आहे. बीड तालुक्यात करपरा नदीमध्ये एका 21 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यूही झालेला आहे. तर गेवराई तालुक्यात एक बैल, एक गाय, वडवणी तालुक्यात एक गाय, धारूर तालुक्यात दोन म्हशी, एक गाय, केजमध्ये एक गाय, परळी तालुक्यामध्ये तीन म्हशी, आष्टीमध्ये एक बैल आणि पाटोदा तालुक्यात एक गाय अशी जनावरे दगावली आहेत. तर घरांचीही पडझड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पडझड परळी तालुक्यात झाली असून त्याखालोखाल पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई, वडवणी आणि शिरूर तालुक्यात ही पडझड झाली आहेे. घरांची पडझड, शेती पिकांच्या नुकसानीची प्रशासनाने कालपासूनच पंचनाम्याला सुरुवात केली आहे.