सहा शादीखान्यासाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर
मुंबई (दि. 23) – परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत दिलेला एक एक शब्द पूर्ण करण्याकडे व पायाभूत सुविधांच्या विकासाकडे एक एक पाऊल टाकत विकासाची घोडदौड सुरूच ठेवली असून त्यांनी मतदारसंघात दिलेल्या आणखी एका शब्दाची पूर्तता करत परळी मतदारसंघातील सहा गावांमध्ये मुस्लिम समाजासाठी शादीखाने उभारण्यास अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मंजुरी मिळवली असून त्यासाठी दीड निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील बर्दापूर (50 लाख), पोहनेर (25 लाख), मिरवट (25 लाख), पिंपळा धायगुडा (25 लाख), धसवाडी (15 लाख) आणि खोडवा सावरगाव (10 लाख) याप्रमाणे एकूण दीड कोटी रुपये शादीखाने बांधण्यास निधी मंजूर करण्यात आला असुन, याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांनी राज्य शासनासह अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत.
मागील आठवड्यातच शिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या भव्य शादी खान्याचे लोकार्पण व महिला भवनाच्या उभारणीचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले होते. त्याचबरोबर 7 दिवसांपूर्वी धर्मापुरी येथील शादीखाना उभारण्यासही एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी विधानसभा क्षेत्रात शहर बायपास सह विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग, ग्रामीण मार्ग, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील शेकडो किलोमीटरचे रस्ते, तीर्थस्थळांचा विकास, विविध शासकीय इमारती, रुग्णालये, पशुवैद्यकीय दवाखाने आदींच्या माध्यमातून दिसणारी विकास कामे केली जात असून पायाभूत सुविधांच्या निर्मानावर धनंजय मुंडे यांनी अधिक भर दिल्याचे मागील काळात दिसून येत आहे.