बीड (रिपोर्टर): लोकसभेपेक्षा बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 55 हजार नवीन मतदारांची नोंद झाली असून लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवलेले असून ऐंशी टक्के मतदान जिल्ह्यात करून घेण्यात येणार आहे. विधानसभेच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहामध्ये आज आयोगाने विधानसभेचे मतदान घोषीत केल्यानंतर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पाठक हे बोलत होते. सहा विधानसभा मतदार संघांसाठी उपजिल्हाधिकारी तथा तथा त्या त्या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. 1 जुलै 2024 या तारखेपर्यंत नवीन मतदार तथा ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ज्यांनी मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे अशा नवीन 55 हजार मतदारांची वाढ झालेली आहे. 22 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल आणि 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीमध्ये उमेदवाराला आपला उमेतदारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करावा लागणार आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात 2416 मतदान केंद्रे उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवून मतदान करावे, असेही आवाहन या वेळी पाठक यांनी केले.या वेळी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, बीड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांची उपस्थिती होती.