बीड (रिपोर्टर): भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अखेर आज भाजपाला रामराम ंठोकत अध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्ष सोडल्याचे जाहीर केले. आपल्या समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेतल्याचे सांगून पुढील निर्णय लवकरच सांगण्याचेही म्हटले. आज मितीला मात्र आपण भाजप सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे बीड जिल्ह्यात भाजपाचा एक-एक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात असतानाच आज थेट भाजपाच्या विद्यमान अध्यक्षाने भाजप सोडल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवाराचा पराभव झाला आणि या पराभवाची जबाबदारी स्विकारत तेव्हा राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा नेतृत्वासह भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला, असे सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांचा राजीनामा स्विकारला नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे थेट दिसून येत आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, माजलगावचे मोहन जगताप, इकडे आडसचे रमेश आडसकर आणि तिकडे धोंडे हेही भाजपा पासून लांब दिसून येत आहेत. आज तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी थेट भाजप सोडल्याची घोषणा करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिपोर्टरशी बोलताना मस्के म्हणाले, काल आमच्या समर्थक, हितचिंतकांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पक्ष सोडण्याबाबत अधिकृत निर्णय झाला. अद्याप आम्ही दुसरा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत थेट पक्ष सोडल्याचे मस्के यांनी म्हटले.