फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट, सरपंचासह दहा जणांवर गुन्हा
मंदिरातील भोंग्याचा आवाज कमी करण्यावरून झाला वाद
अंबाजोगाई, रिपोर्टर)ः- अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात वकिली करणार्या ज्ञानेश्वरी अंजान या 36 वर्षीय महिलेला गावातील सरपंचासह दहा जणांनी सनगाव शिवारातल्या अंबराई नावाच्या शेतात रिंगण करून प्रचंड प्रमाणात मारहाण केल्याची धक्कादायक घटना दि.17 एप्रिल रोजी उघडकीस आली. महिलेच्या पाठीवरचे वळ, मारहाणीच्या खूना असलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल उभा महाराष्ट्र विचारू लागला. सदरच्या मारहाणीची घटना ही 14 एप्रिल रोजी घडली. मारहाण करणार्या सरपंचासह त्याच्या सोबतच्यांनी ज्ञानेश्वरीला पाईपने मारहाण केल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या वकिल महिलेस रिंगण करून दहा जणांनी मारल्याची घटना घडली. त्या महिलेच्या अंगावरील मारहाणीच्या खूना असलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये प्रचंड खळबळ उडाली. मारहाणी नंतर त्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एक दिवसाच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेबाबत ज्ञानेश्वरी अंजान यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, 23 फेब्रुवारी 2023 रोजी गावातील एका मंदिराच्या भोंग्याचा आवाज तीव्र होता. मी त्यावेळी अभ्यास करत होते. जास्त आवाजामुळे माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हते. मी त्यावेळी सरपंच अनंत अंजान यांना फोन करुन भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितला. त्यांनी मी कर्मचार्याला आवाज कमी करायला सांगतो, असे सांगितले. मात्र, दोन तास उलटूनही काही झाले नाही. मी पुन्हा फोन केला तेव्हा कर्मचारी माझा कॉल उचलत नसल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे मी संबंधित कर्मचार्याच्या घरी जाऊन देवळातील भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितले तेव्हा मी नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाऊ शकत नाही, असे त्याने म्हटले. त्यामुळे मी पुन्हा सरपंचांना कॉल केला तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार करायला सांगितले. मी तरीही आधी ग्रामविकास अधिकार्याला फोन केला. तो बोलला मी उद्या आल्यावर आवाज कमी करतो. त्यावर मी बोलले की, आवाज सकाळपर्यंत सुरु राहिला तर मी काय करु? मला त्रास होत असल्याने आवाज सहन होत नव्हता. त्यामुळे मी पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार केली. पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप करुन आवाज कमी केला. त्यानंतर दुसर्या दिवशी सरपंच त्याच्या लोकांना घेऊन माझ्या घरी आला. माझ्या आई-वडिलांवर दबाव टाकला. तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करुन द्यायचे आहेत की नाही, असे त्याने विचारले. या प्रकारानंतर सरपंचाने मुद्दाम पिठाच्या तीन गिरण्या आमच्या घराच्या बाजूला सुरु केल्या. या सततच्या आवाजाने मला गंभीर प्रकारचा मायग्रेन झाला. मला पाठदुखीची समस्याही जडली, असा आरोप ज्ञानेश्वरी अंजान यांनी केला.

या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसात ज्ञानेश्वरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा सपकाळ, नवनवाथ जाधव, मृत्यूंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे, नवनाथ मोरे (सर्व रा.सनगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







