रमेश आडसकरांच्या प्रवेशाबरोबर थोरल्या क्षीरसागरांच्या भेटीबाबत चर्चा
बीड/माजलगाव (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड, माजलगाव आणि परळी येथील जागेबाबत महाविकास आघाडीचा तिढा अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रमेश आडसकर हे राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करतील, अशी एकीकडे चर्चा होत असतानाच दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांना भेटणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. केवळ महाविकास आघाडीकडून या तीन मतदारसंघात उमेदवारांची घोषणा होत नसल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यात कोण उमेदवार येतो, याची उत्सुकता आणि धाकधूक लागून आहे.
अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ना. धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा? हा प्रश्न महाविकास आघाडीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ येईपर्यंतही सोडवता आलेला नाही. आघाडीकडून अद्याप परळीला कोणीही उमेदवार दिलेला नही. तर दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघात आघाडीकडून अनेक इच्छूक शरद पवारांच्या दरबारी दिसून येत असले तरी विद्यमान आमदाराला याठिकाणी आघाडीकडून तिकीट देण्याचे संकेत मिळून येत आहेत. मात्र उमेदवारी घोषीत न केल्याने तिथेही साशंकता निर्माण झाली आहे. आज जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांची भेट घेणार असल्याबाबत चर्चा होत आहे. मात्र दुजोरा कुठेही मिळत नाही. तिकडे माजलगावमध्येही आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. याठिकाणी मोहन जगताप यांच्याबरोबर रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत आहे. आज आडसकर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच जवळच्या कार्यकर्त्यांना आज रमेश आडसकरांना मुंबईत बोलवले आहे. या तिन्जही मतदारसंघात आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आला नसल्याने महायुतीच्या उमेदवारापुढे महाविकास आघाडीची बोलती बंद आहे की काय? अशी चर्चा होत आहे.