मुंबई: भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये २५ नावांचा समावेश आहे. भाजपनं आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर केलेले आहेत. मुंबईतील ५ आमदारांची तिकिटं भाजपकडून कापली जाणार अशी चर्चा होती. पण पहिल्याच यादीत यातील दोघांची नावं प्रसिद्ध झाली. त्यामुळे बाकीचे तिघे गॅसवर होते. दुसऱ्या यादीत यातील एकाचंही नावं नव्हतं. त्यामुळे त्यांची धाकधूक चांगलीच वाढली. अखेर तिसऱ्या यादीत तिघांपैकी दोघांची नावं जाहीर झाली आहेत. तर आमदार सुनील राणेंचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. ते बोरिवलीचे आमदार आहेत. त्यांच्या जागी पक्षानं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
बोरिवली विधानसभा मतदारसंघ भाजपचा अतिशय मजबूत बालेकिल्ला मानला जातो. भाजपची स्थापना झाल्यापासून इथे केवळ आणि केवळ भाजपचाच उमेदवार विजयी झालेला आहे. १९८० पासून बोरिवलीकर भाजपच्याच उमेदवाराला निवडून दिला. १९९५ पासून इथे भाजपच्या उमेदवार कायम ५० हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. केवळ २००९ ची विधानसभा निवडणूक यास अपवाद ठरली. त्यावेळी भाजप उमेदवाराचं मताधिक्क्य ३० हजारांपर्यंत खाली आलं होतं.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. आदित्य ठाकरे वरळीतून लढले. त्यामुळे वरळीत जनसंपर्क कार्यालय असलेल्या सुनील राणेंना भाजपनं थेट बोरिवतीतून तिकीट दिलं. विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ९५ हजार ०२१ मतांनी धुव्वा उडवत बोरिवलीतील बालेकिल्ल्यात भाजपची घोडदौड कायम ठेवली. पण त्यांच्याबद्दल अँटी इन्क्मबन्सी असल्याची चर्चा होती. त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. ती खरी ठरली.
२०१४ पासून भाजप बोरिवलीतून सातत्यानं नवा चेहरा देत आहे. २००४ आणि २००९ मध्ये भाजपकडून गोपाळ शेट्टी निवडून आले. २०१४ मध्ये तो लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे २०१४ मध्ये विनोद तावडेंना संधी देण्यात आली. त्यांनी जवळपास ८० हजार मतांनी विजय साकारला. पण २०१९ मध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी सुनील राणेंना संधी देण्यात आली. आता त्यांचंही तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपनं बोरिवलीत नवा चेहरा दिला आहे.
वाचा आज जाहीर झालेल्या भाजपा उमेदवारांची संपूर्ण यादी
क्र. मतदारसंघ क्रमांक मतदारसंघ नाव उमेदवार नाव
१ ३२ मुर्तिजापूर (SC) हरिश पिंपळे
२ ३५ कारंजा सई डहाके
३ ३९ तेओसा राजेश वानखडे
४ ४३ मोर्शी उमेश यावलकर
५ ४४ आर्वी सुमित वानखेडे
६ ४८ कटोल चरणसिंग ठाकूर
७ ४९ सावनेर आशीष देशमुख
८ ५५ नागपूर मध्य प्रवीण दटके
९ ५६ नागपूर पश्चिम सुधाकर कोहले
१० ५७ नागपूर उत्तर (SC) मिलिंद माने
११ ६२ साकोली अविनाश ब्राह्मणकर
१२ ७१ चंद्रपूर (SC) किशोर जोरगेवार
१३ ८० आर्णी (ST) राजू तोडसाम
१४ ८२ उमरखेड (SC) किसन वानखेडे
१५ ९० देगलूर (SC) जितेश अंतापूरकर
१६ १२८ डहाणू (ST) विनोद मेढा
१७ १३३ वसई स्नेहा दुबे
१८ १५२ बोरीवली संजय उपाध्याय
१९ १६४ वर्सोवा डॉ. भारती लव्हेकर
२० १७० घाटकोपर पूर्व पराग शाह
२१ २३१ आष्टी सुरेश धस
२२ २३५ लातूर शहर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
२३ २५४ माळशिरस (SC) राम सातपुते
२४ २५९ कराड उत्तर मनोज घोरपडे
२५ २८५ पळुस-कडेगाव संग्राम देशमुख