चौकीतील पोलीस करतात तरी काय?
बीड (रिपोर्टर): बीड बसस्थानकामध्ये नेहमीच चोरटे नागरिकांच्या खिशातील मोबाईल, पैसे व महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेतात. या चोरी प्रकरणी आळा बसत नाही. मध्यंतरी चोरटे आणि तेथील पोलिसांमध्ये मिलीभगत असल्याची चर्चाही झाली होती. हे चोर्याचे सत्र थांबत नसून एका प्रवाश्याच्या खिशातील 28 हजार रुपये चोरीला गेले आहेत.
तुकाराम भाऊराव भंडारे (रा. बेडुकवाडी ता. गेवराई ह.मु. तुळजाभवानी, साईनगर चंदनगरनगर) हे बीड बसस्थानकातून प्रवास करत होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील 28 हजार रुपये काढून घेतले. आपल्या खिशातील पैसे चोरीला गेल्याचे भंडारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानीं शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान बीड बसस्थानकातून नेहमीच प्रवाशांच्या खिशातील पैसे , मोबाईल चोरीला जातात. महिलांच्या गळ्यातील दागिनेही चोरी होत आहेत. या ठिकाणी चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असताना त्यावर प्रतिबंध लावला जात नाही . मध्यंतरी पोलीस आणि चोरट्यात साटेलोटे असल्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर काही प्रमाणात चोर्या कमी झाल्या होत्या. आता पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. बसस्थानकातील चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रवाश्यातून होत आहे.