चोरीला गेलेले शेतकर्याचे लाख रुपये तासाभरत मिळाले परत
दिंद्रुडचे प्रभारी सपोनि जोनवाल यांची तत्परता
बीड (रिपोर्टर) बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका भामट्याने शेतकर्याचे 1 लाख रुपये खिशातून काढून घेतल्याची घटना तेलगाव बसस्टँडवर घडली होती. शेतकर्याने तात्काळ दिंद्रुड पोलिसात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिंद्रुडचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी तात्काळ कारवाईचे चक्र फिरवून अवघ्या काही तासातच भामट्याच्या मुसक्या बांधत शेतकर्याला लाख रुपये परत मिळवून दिले. दिंद्रुड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या शेतकर्याने समाधान व्यक्त केले.
भारत महादेव माने (रा. शिंदेवाडी ता. माजलगाव, वय 56 वर्षे) हे शेतकरी गावी जाण्यासाठी काल दुपारी तेलगाव बसस्टँडवर बसमध्ये चढत होते. गर्दीचा फायदा घेऊन किरण भास्कर पवार (वय 20, रा. सागर कॉलनी, पाथर्डी जि. परभणी) याने त्यांच्या खिशातील एक लाख रुपये लंपास केले. आपले पैसे चोरीला गेल्याचे शेतकरी माने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दिंद्रुड पोलिसात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी बसस्थानकात धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही चेक करत तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी केल्याने शेतकरी भारत माने यांना आपले चोरीला गेलेले एक लाख रुपये मिळाले. दिंद्रुड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या शेतकर्याने समाधान व्यक्त केले. ही कारवाई सपोनि. जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक राडकर, पोलीस हवालदार गायकवाड, खेत्रे यांच्यासह दिंद्रुड पोलिसांनी केली.