दीड महिना झाला तरी कर्मचारी स्थळ पाहणी करायला जात नाहीत
पोखरा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण
गेवराई (रिपोर्टर) जसे ग्रामसेवक, तलाठी हे गावच्या नागरिकांच्या सेवेसाठी आहेत. तसेच कृषी सहाय्यक देखील शेतकर्यांच्या सोयीसाठी उपलब्ध असले पाहिजेत. मात्र जेजुरकरांच्या काळात जिल्ह्यातील कृषी विभाग सुस्त झाला आहे. गेवराई तालुक्यातील काजळवाडी येथील कृषी सहाय्यक एस. एस. पवारहे शेतकर्यांचे सेवक आहेत की दलालांचा याचा शोध घ्या. जेजुरकर साहेब तुमच्या लोकांना धाबे सोडून शेतकर्यांच्या बांधावर जायला सांगा नसता हा शेतकरी तुम्हाला कार्यालयात बसू देणार नाही.
गेवराई तालुक्यातील काजळवाडी गावातील शेतकर्यांनी पोकरा योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेतला आहे. यात काही शेतकर्यांनी ठिबक करून दीड महिना झालं. पण स्थळ पाहणी करायला कुणी यायला तयार नाही. हजार वेळा कृषी सहाय्यक एस. एस. पवार यांना स्थळ पाहणी करायला विनंती केली, पण त्यांचा तोरा कमी व्हायला तयार नाही, करतो, बघतो, दुकानदारांचं आमचं ठरलंय, सगळ्या फाईल एकदाच करायच्या आहेत, असली उत्तरं तो देतो आहे. जेजुरकर साहेब व मडके साहेब तुम्ही यांना सांगा, की दुकानदाराच्या दोन पैशात तुम्ही मिंदे आहेत, शेतकरी नाही, त्यामुळे सगळ्या फाईलची पिपाणी वाजवण्यापेक्षा शेतकर्यांच्या बांधावर जाऊन काम करायला प्राधान्य दे म्हणावं.
दलाली करणार्या दुकानदारांकडून रिपोर्टरला धमकवण्याचा प्रयत्न
रिपोर्टरने पोखरा योजनेचा भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यानंतर या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या साखळीने बेचैन होऊन अधिकार्यांसोबत दलाली करनार्या काही दुकांदारांच्या मार्फत थेट रिपोर्टरच्या प्रतिनिधीला फोन करून धमकवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही असल्या गिधाड धमक्यांना रिपोर्टर जुमानणार नाही. आजपर्यंत रिपोर्टर या प्रकरणात 1 टक्का लक्ष दिले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी दलालांच्या सापळ्यात अडकून असले पोरखेळ न करता इमानदारीने शेतकर्यांची कामे करण्यावर भर द्यावा तेव्हा हाच रिपोर्टर तुमचे कौतुक करायला सर्वात पुढे असेल.
कृषी सहाय्यकांनो तुम्ही
इमानदारी जपा
राजकारण नाही असं एक गाव नाही. पण गावातला प्रत्येक माणूस राजकारणी नसतो, त्यामुळे शेतकरी, कष्टकरी लोकांना लाभ देतांना आपण राजकारण्यांच्या हातचे बाहुले नाहीत ना हे तपासून बघा. सरपंच म्हणला तर मिटिंग घ्यायची नाही तर नाही ही भूमिका चुकीची आहे. लोकांचं कल्याण तुमच्या हातात आहे, तुम्ही इमानदारी जपा. हा प्रकल्प अवघ्या काही दिवसांसाठी आहे हे सांगून गावच्या कारभार्यांना ही कामं करण्यासाठी प्रवृत्त करा.
रिपोर्टरची बातमीपूर्वी पवारला कल्पना
पोकरा योजनेला कुरण बनवू पाहणार्या काही कृषी सहाय्यकांच्या कुकर्माची पोलखोल केल्यानंतर तालुक्यातील असंख्य शेतकरी आपल्या अडचणी थेट रिपोर्टरकडे सांगत आहेत. पण, बतमीपेक्षा लोकांची कामे व्हावीत या हेतूने आम्ही श्री. पवार यांना फोन करून स्थळ पाहणी करण्याची विनंती केली. पण, पवारांनी करतो की, खूप दिवस थोडेच झालेत, महिना दीड महिना तर झालं, दुकानदाराचे आणि आमचे ठरले आहे. सगळ्या फाईल एकदाच करायचं. ही असली गुर्मीची भाषा बोलून आपण किती मुजोर आणि माजोर आहोत याची झलक त्यांनी दाखवून दिली.
सरपंच कालिदास नवलेंनी या लोकांपासून वेळीच सावध व्हावे
रात्रंदिवस लोकांची कामे व्हावेत यासाठी धडपड करणारा सरपंच ही रुई गावच्या कालीदास नवले यांची ओळख. पोकरात तुम्ही कसलेच राजकारण न करता गावचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेतली. त्या भूमिकेचं आणि त्यातून झालेल्या विकासाचं आम्ही बातम्यांमधून कौतुक केलं. पण, तुमच्या गावात एस. एस. पवार सारखे मग्रूर कर्मचारी असतील तर तुमच्या या लोकसेवेला शून्य किंमत आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा, दुकानदारांची दलाली खाणारी आणि शेतकर्यांची अडवणूक करणारी ही असली ब्याद वेळीच हाकलून द्या, नसता तुमच्या नावावर पैसे घ्यायला सुद्धा हे कमी करणार नाहीत. तुम्ही चांगली काम करता पण तुमच्याच गावात हे कर्मचारी असले वसुली अभियान आणि मगृरीचे धोरण राबवत असतील तर लोकांना तुमच्या प्रांजळ भावनेची काय किंमत राहणार. त्यामुळे तुम्हीपण या लोकांपासून वेळीच सावध व्हावे.