केज (रिपोर्टर): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे संतप्त पडसाद आज केज तालुक्यात उमटताना दिसून येत आहेत. केज शहरासह मस्साजोग कडेकोट बंद करत संतप्त नागरिकांनी केज तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले तर केज शहर पुर्णत: बंद करून मुख्य महामार्ग बंद पाडले. अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यालायावर काहींनी अंधाधूंद दगडफेक केली. घटनास्थळी पोलीस तळ ठोकून असून आंदोलकांनी देशमुख यांच्या मारेकर्याला पकडून तात्काळ फाशी द्या, येथील पोलीस निरीक्षक पाटील व जिल्हा पोलीस अधिक्षक आणि कलेक्टरवर कठोर कारवाई करा या प्रमुख मागण्या घेऊन आंदोलक दुपारपर्यंत रस्त्यावर असल्याचे दिसून आले.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे काल अपहरण करण्यात आले. ती तक्रार दाखल करून पोलीस अपहरणकर्त्यांच्या मागावर असताना देशमुख यांचा मृतदेह मिळून आला. अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आणि तेव्हापासून मस्साजोगसह केज तालुक्यात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. रात्री मस्साजोग फाट्यावर काहींनी रस्ता अडवून धरण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचे आज तीव्र पडसाद केज शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये उमटताना दिसून येत आहेत. आज सकाळपासून केज शहर आणि मस्साजोग कडेकोट बंद आहे. चारशे ते पाचशे जणांच्या जमावाने केज शहरात रॅली काढत पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत केज शहर बंद केले.
केज शहरातल्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत प्रमुख वाहतूक ठप्प केली. इकडे अंबाजोगाईकडे जाणारा, कळंबकडे जाणारा आणि बीडकडे येणारा प्रमुख रस्ता पुर्णत: बंद असल्याने या भागातील वाहतूक दुपारी एक वाजेपर्यंत पुर्णत: ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले. नागरीक प्रचंड संतप्त दिसून आले. केजचे पोलीस निरीक्षक पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी हे इमरजन्सीच्या वेळेस फोन उचलत नाहीत, असा थेट आरोप संतप्त नागरिकांनी करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर देशमुख यांच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी द्या, अशा आशयाचं फलकही नागरिकांनी या वेळी फडकवलं.
घटना अत्यंत गंभीर असून पोलीस प्रशासनाच्या निष्क्रीय कार्यप्रणालीमुळेच मारेकर्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संतप्त नागरिकांनी केज शहरात काही ठिकाणी दगडफेकही केली. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कार्यालय त्यांनी फोडून टाकले. केज शहरात तणावपुर्ण वातावरण असून तालुक्यात भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे.