किरीट सोमय्या परळीत ठाण मांडून; नायब तहसीलदाराने दिले बनावट प्रमाणपत्र, येत्या दोन दिवसात गुन्हा दाखल होणार, तहसीलदारच फिर्यादी असणार, बीड, परळी पाठोपाठ गेवराई, माजलगावातही बनावट प्रमाणपत्र घोटाळा.

परळी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्यांनी तब्बल 10 हजारापेक्षा अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र काढल्याचा दावा करत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधी बीडमध्ये काहींवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सोमय्या परळीत डेरेदाखल झाले. तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी थेट परळी पोलीस ठाणे गाठले. परळीतील 1 हजार 244 बोगस जन्म प्रमाणपत्र तात्काळ रद्द होणार असल्याचे सांगून हे जन्मप्रमाणपत्र नायब तहसीलदार यांनी दिल्याचे समोर येत आहे. न.प.मधील ज्या 294 जन्मनोंदी आहेत त्यामध्ये कुठे फोटो आहे तर कुठे पत्ता नाही, सह्या बोगस आहेत. असे एक ना अनेक अनागोंदी प्रकार घडलेले आहेत. इथे जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती गेवराई, माजलगावमध्येही असल्याचे सोमय्यांनी म्हटले. सोमय्यांच्या भेटीनंतर तहसीलदार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी परळी पोलिसात डेरेदाखल झाल्याचे सांगण्यात येते.

बीड जिल्ह्यात बांग्लादेशींनी मोठ्या प्रमाणावर जन्मप्रमाणपत्र काढल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी याचा छडा लावण्यास सुरुवात केली. या प्रकरणी गेल्या आठवड्यात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काहींवर गुन्हा दाखल झाला आहे. आज किरीट सोमय्या यांनी परळीत डेरेदाखल होत परळी तालुक्यातही 1244 जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याने ते रद्द होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमय्या यांनी सकाळी तहसीलदार यांच्या सोबत या प्रकरणी चर्चा केली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास किरीट सोमय्या हे पोलीस ठाण्यात डेरेदाखल झाले. या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. माध्यमाशी बोलताना सोमय्या म्हणाले, येथील 1244 बोगस जन्मप्रमाणपत्र तात्काळ रद्द होणार आहेत. नायब तहसीलदारांनी हे बोगस प्रमाणपत्र दिले आहेत.
बोगस प्रमाणपत्र देताना बोगस सह्या, काहींमध्ये पत्ते नाहीत, फोटो नाहीत अशा अनागोंदी पद्धतीने ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी परळी न.प.ला 294 जन्मनोंदी देण्याचे आदेश दिल्याचेही म्हटले. किरीट सोमय्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तहसीलदार हे परळी पोलिसात डेरेदाखल झाले होते. आज किंवा येत्या दोन दिवसात या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल होतील. दस्तुरखुद्द तहसीलदार यात फिर्यादी होणार आहेत. पुढे सोमय्या म्हणाले की, गेवराई तालुक्यातही असे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तेथेही मी जात आहे आणि यानंतर मी पुन्हा बीडला आल्यावर माजलगाव येथे जाणार आहे. तेथेही बोगस प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.