सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास.
परळी (रिपोर्टर): बीड येथून सोनपेठला एसटी बसमधून जाताना अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध दाम्पत्याच्या मोठ्या बॅगमधील एक लाल रंगाची पर्स चोरून दाम्पत्याला तब्बल 9 लाख रुपयांना लुटल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गु.र.नं. 76/2025 कलम 303, (2), 305 सी भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील सुर्यकांत परळकर व त्यांच्या पत्नी माधुरी सुर्यकांत परळकर या बीड येथून एसटी बसने सोनपेठकडे गेल्या तीन दिवसांपूर्वी निघालेल्या होत्या. बीड ते सोनपेठ प्रवास त्यांचा व्यवस्थित झाला मात्र जेव्हा हे वृद्ध दाम्पत्य सोनपेठ येथे घरी पोहचले तेव्हा प्रवासादरम्यान आपल्या बॅगमधील पर्सची चोरी झाल्याचे लक्षात आले त्या पर्समध्ये 10 लाखांपेक्षा अधिक किमतीचे दागिने होते. माधुरी परळकर यांच्या म्हणण्यानुसार ते जेव्हा छत्रपती संभाजीनगर येथून बीड-परळी-सोनपेठसाठी बसमध्ये बसले तेव्हा त्यांच्या एका मोठ्या बॅगमध्ये लाल रंगाची छोटी पर्स ठेवली होती. त्या पर्समध्ये सुमारे 3 लाखांची तीन पदरी मोहन माळ, 3 लाखांचे नेकलेस, 2 लाखांची सोन्याची बोरमाळ यासह अन्य एक लाख रुपयाचे सोन्याचे ऐवज त्यामध्ये ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरटट्यांनी ती छोटी लाल रंगाची पर्स चोरून नेली. या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.