मुंबई, (रिपोर्टर)ः- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील दोन प्रमुख नेते एकत्र येणार, अशी चर्चा शनिवारपासून सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षातील ‘युती’समर्थकांनी श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला दिला आहे. तसंच, परदेश दौर्यावर असलेल्या राज ठाकरे यांनीही त्यांच्या नेत्यांना प्रतिक्षा करण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे 29 एप्रिलला मुंबईत दाखल होणार आहे. तेव्हाच या संदर्भातील निर्यण जाहीर केला जाईल, असं मनसे नेत्यांनी सांगितलंय. तर, ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीही यासंदर्भात सुतोवाच केले आहेत. ते आज माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे मुंबईत नसून ते कुठे गेलेत हे माहीत नाही. त्यांनी एक हात पुढे केला आहे, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. आपण इथेच थांबायला हवं. काही दिवस जाऊयात. मनसे प्रमुखांना मुंबईत येऊद्यात. त्यानंतर आपण चर्चा करू. रोज त्यावर चर्चा करून त्या विषयाचं गांभीर्य का घालवायचं? हा लोकांच्या मनातील विषय आहे. हा विषय जिवंतच राहणार आहे. त्यांच्या नात्यात कोणीही येऊन चर्चा करण्याची गरज नाही. या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहात राहून पाहिलंय.त्यांच्या एकमेकांविषयी काय भावना आहेत हे मला माहितेय. या सगळ्यांची जाणीव मलासुद्धा आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नाहीत. तसंच, या युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत.