
हे पहलगमचा बदला घेणार नाहीत, मनोज जरांगेंचा हल्ला
छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर)ः- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला हे सरकार घेणार नाही. सध्या फक्त विमानं आणि रणगाडे पळताना दिसत आहेत. सरकार फक्त विमानाचे डिझेल नासवत आहे, अशी खरमरीत टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारने जनतेच्या जीवाशी खेळता कामा नये. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदाच प्रयोग केला होता, सगळा देश हा हादरून गेला होता, त्यांना सगळे भीत होते, यांना कोणीच भीत नाही. फक्त तिकडे पाण्याची आणीबाणी सुरू झाली म्हणून सांगतात तिकडे तर पाणी सन्नाट वाहत आहे. हे नुसते विमानाचे रणगाड्याचे, ट्रक मध्ये फौजी लोक बसवलेले, पळालेले दाखवतात, पहिले व्हिडिओ आहेत की आत्ताचे आहेत याचा मेळ लागत नाही. नुसतं युद्धजन्य परिस्थिती दाखवतात. दुसर्या दिवशी तिसर्या दिवशी तीच परिस्थिती असते. तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटते. मोदी सरकार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करताना दिसत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकार पाकिस्तानवर बॉम्ब टाकत नाही. बॉम्ब गोडाऊनमध्ये फक्त साठवून ठेवले आहेत. हे ट्रक खपाखप ट्रकमधून नेऊन पाकिस्तानवर टाकायला पाहिजेत, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती निमित्त सरकारने नियोजित कार्यक्रम (बैठक) निर्णय घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी आरक्षणाचा निर्णय देखील घ्यावा. डढ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे कामं देखील सरकारनं करावे. जातीयवादात सरकारने पडू नये. राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षण देऊन आरक्षण दिलं, आम्ही ते सर्व जातीच्या देण्याची मागणी केली होती,इतर सर्व बांधवांसाठी आम्ही लढलो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
धनगर बांधवांनी सांगितलं होतं की, आम्ही नियमाने त्यात आहोत, पुरावे आहेत. 29 तारखेला आरक्षणसाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. लेकरांचा फायदा व्हावा म्हणून मी करतोय, सर्वांनी ताकदीने मुंबईला यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. दोन दिवस कामं बुडवा पण या. जे येऊ शकत नाहीत त्यांनी आम्हाला सोडायला यायचं तिथं येऊन आम्हाला आशीर्वाद द्या. ताकदीने मराठे येणार, मागच्यापेक्षा चार पट मराठे मुंबईत दिसणार, असा विश्वास यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.