महाराष्ट्रातील ’या’ जिल्ह्यात ’वॉर मॉक ड्रिल’
नवी दिल्ली (वृत्तसेवा): जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाचं सावट आहे. त्यातच गृह मंत्रालय सातत्याने उच्चस्तरीय बैठका घेत आहे. नुकतेच गृह मंत्रालयाने सिविल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याची सूचना सर्व राज्यांना दिली आहे. 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची सूचना देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या निर्देशावर 7 मे रोजी देशातील 244 जिल्ह्यात सिविल डिफेन्स मॉक ड्रिल होईल. मागील 7 दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेत आहेत. संभाव्य एक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांनी मिळेल असा इशारा मोदींनी दिला आहे.
गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
244 सिविल डिफेन्स जिल्हा प्रतिनिधींसोबत गृह सचिवांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील. सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणार्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होईल. 2010 च्या सूचीनुसार 244 नागरीक सुरक्षा जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. या बैठकीत देशाची सुरक्षा आणि येणार्या आव्हांनाना तोंड देण्याची क्षमता याबाबत आढावा घेतला जाईल.
2010 च्या अधिसूचनेनुसार, सिविल डिफेन्स जिल्हे 3 कॅटेगिरीत विभागले गेले आहेत. कॅटेगिरी 1 मध्ये नवी दिल्ली, सूरत, वडोदरा, काकरापार, मुंबई, उरण, तारापूर, तालचेर, कोटा, रावत भाट्टा, चेन्नई, कलपक्कम, बुलंदशहर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर यांचा कॅटेगिरी 1 तर ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड यांचा कॅटेगिरी 2 मध्ये समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा कॅटेगिरी 3 मध्ये समावेश आहे.
मॉक ड्रिलमध्ये काय होणार?
244 जिल्हे, तालुक्यात या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येणार आहे. मॉक ड्रिल काळात ब्लॅकआऊट केले जाईल. बुधवारी सायरन वाजेल, लोकांना हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी लपण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. मॉक ड्रिलमध्ये काय काय करायचे हे शिकवले जाईल. एअर स्ट्राईकसारख्या स्थितीत लोकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या जातील. आपत्कालीन स्थितीत प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी मॉक ड्रिल महत्त्वाचे मानले जाते.