- चौसाळा (रिपोर्टर) चौसाळा येथील कृषी सेवा दुकानांमध्ये 266 रुपयांना असणारे युरियाचे पोते काही दुकानांमध्ये 300 रुपये तर काही दुकानांत 320 रुपये अशी विक्री करण्यात येत होती. तसेच ज्या शेतकर्यांनी इतर खते किंवा औषधे त्या दुकानांमधून खरेदी केले तरच त्यांना युरिया देण्यात येत होता. याबाबत चौसाळा येथील शेतकरी व्यंकट औताडे यांना व्यंकटेश कृषी सेवा केंद्र व लता कृषी सेवा केंद्र या ठिकाणी युरिया हवा असेल तर 300 रुपये प्रती पोते मिळेल आणि त्यासोबत इतर खते किंव्हा औषधे घ्यावे लागतील असे दुकानदार म्हणाले. याबाबत येथील शेतकरी व्यंकट औताडे, विष्णु कळासे, राहुल नाईकवाडे, सुहास झोडगे आदींनी जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सोमवार (ता. 1) रोजी तालुका कृषी कार्यालयाकडून तालुका कृषी अधिकारी श्री गंड्डे यांनी चौसाळा येथील कृषी सेवा केंद्रांची शेतकर्यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली.
-
विनोद कृषी सेवा केंद्रात ओरिजनल
पावती न देता अशी पावती दिली जाते.यामध्ये व्यंकटेश कृषी सेवा केंद्र, विनोद कृषी सेवा केंद्र, कमल ऍग्रो एजन्सी, त्रिमुर्ती कृषी सेवा केंद्र, लता कृषी सेवा केंद्र आदी कृषी दुकानांच्या तपासणी करण्यात आल्या. यामध्ये विनोद कृषी सेवा केंद्र चालक तालुका कृषी अधिकारी श्री गंड्डे यांना असे म्हणाले की, 300 रुपयांना मी युरियाचे पोते विकतो आणि यापुढे ही विकणार याबाबत तालुका कृषी अधिकारी म्हणाले की, तुम्ही मला लेखी द्या त्यानंतर दुकान चालक म्हणाले की, आतापर्यंत 300 रुपयांना पोते विकले यापुढे, नियमानुसार 266 रुपयांना विक्री करेल. तसेच या दुकान चालकाकडून ओरिजनल पावती शेतकर्यांना देण्यात येत नाही अशी तक्रार करून बोगस दिलेली पावती शेतकर्यांनी कृषी अधिकार्यांना दाखवली, या दुकानातील तीन खतांच्या सॅम्पल कृषी अधिकारी यांनी तपासणीसाठी घेतल्या आहेत. वरील सर्व गोष्टींचा पंचनामा करून त्यावर शेतकर्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.
कमल अॅग्रो एजन्सीज या दुकानात
भावफलकात युरियाचा भाव लिहिलेला नाही - त्यानंतर कमल ऍग्रो एजन्सी या दुकानाची तपासणी करण्यात आली या दुकानात भाव फलकावर युरिया ची किंमत टाकलेली नव्हती. तसेच शेतकर्यांना खते खरेदी केल्यानंतर कुठलीच पावती देण्यात येत नाही असे खुद्द दुकान चालक रोशन खिंवसरा म्हणाले सदरील दुकान चालक चक्क तालुका कृषी अधिकारी गंड्डे यांनाच नियम शिकवु लागला व तो शेतकर्यांना पावत्या देत नसल्याचे समर्थन करत होता. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी त्या दुकानाचा पंचनामा करून त्यावर शेतकर्यांच्या सह्या घेतल्या. यानंतर तालुका कृषी अधिकारी लता कृषी सेवा केंद्रा कडे गेले. तालुका कृषी कार्यालयाचे पथक इतर कृषी दुकानांची तपासणी करत असताना कमल ऍग्रो एजन्सी या दुकानात शेतकरी युरिया खरेदीसाठी गेले असता शेतकर्यांना पावती देण्यास नकार दिला व तो दुकान चालक असे म्हणाला की, आम्ही कृषी कार्यालयाच्या अधिकार्यांना हप्ते देतोत ते आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत. त्यावेळी सदरील शेतकरी म्हणाला की, थांबा मी तालुका कृषी अधिकारी यांना बोलावतो ते इथेच आहेत. त्यावेळी त्या शेतकर्यास पावती देण्यात आली. अशा प्रकारे चौसाळा येथील कृषी दुकान चालक खुले आम पावत्या न देता चढ्या भावाने खते विक्री करत आहेत. आणि अधिकार्यांना न जुमानता उलट अधिकार्यांच नियम शिकवत आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी दुकानांच्या तपासण्या करून पंचनामा केला असला तरी ते खरोखरच कार्यवाही करतात का? की दुकानदार म्हणल्याप्रमाणे अर्थपूर्ण व्यवहार करून कार्यवाही कडे दुर्लक्ष करतात अशी चर्चा सध्या चौसाळा व परिसरातील शेतकर्यांनामध्ये सध्या दिसून येत आहे. सदरील तपासणी वेळी तालुका कृषी अधिकारी श्री गंड्डे, कृषी सहाय्यक श्री बहिरवाळ, श्री बागडे आदी कृषी कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.