कर्मचार्यांच्या दांड्या; सर्वसामान्यांची कामे खोळंबली
बीड (रिपोर्टर) प्रशासक असलेल्या बीड नगरपालिकेची प्रशासन व्यवस्था पूर्णत: ढासळत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून वीजेचे बील भरले नसल्यामुळे वीज कंपनीने बीड नगरपालिकेचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे नगरपालिकेचे अनेक कामे खोळंबत असून लाईटच नाही तर आम्ही तिथे बसून तरी काय करणार? असे उत्तर देत कर्मचारीही नगरपालिकेबाहेर रेंगाळताना पहावयास मिळत आहेत. पर्यायी व्यवस्था असलेल्या जनरेटर अथवा इर्न्व्हटरच्या आधारे संगणकीय काम होत नसल्याचा निर्वाळाही काही कर्मचार्यांकडून दिला जातो. त्यामुळे नगरपालिकेमध्ये आलेल्या सर्वसामान्य माणसांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. एकीकडे शहरातून लाखोंची वसूली होत असताना दुसरीकडे वीज बील भरण्यापोटी पैसा नसल्याचे कारण नगरपालिका समोर करते आणि वीज कंपनी थेट नगरपालिकेचाच विद्युत पुरवठा तोडते ही न.प.वर आलेली नामुष्की म्हणावी लागेल.
बीड नगरपालिकेच्या इमारतीसाठी वीज कंपनीकडून अधिकृतपणे पुरवला जाणारा विद्युत पुरवठा अखेर विज कंपनीने बील न भरल्यामुळे दोन दिवसापूर्वी खंडीत केला. बीड नगरपालिकेवर प्रशासक असून सर्व कारभार मुख्याधिकारी ढाकणे हे पाहत आहेत. शहरातून नगरपालिका वसुली करत असली तरी वीज बीलापोटी पैसे भरायला न.प.कडे पैसे नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसापासून नगरपालिकेचा विज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे कार्यालयात कर्मचारीही बसत नाहीत. संगणकावर काम करावे लागते त्यासाठी व्यवस्थीत विजेचा पुरवठा नाही. जनरेटर अथवा इर्न्व्हटरच्या सहाय्याने संगणकीय काम व्यवस्थीत होत नाही. त्याला बॅकअप मिळत नाही असे अनेक कारणे कर्मचारी बोलावून दाखवतात. केवळ लाईट नसल्यामुळे कर्मचार्यांची गैरहजेरीही गेल्या दोन दिवसात नगरपालिकेमध्ये प्रामुख्याने दिसून आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे काम खोळंबले आहे.