बीड (रिपोर्टर) शहरात अनेक भागात सिमेट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. ही धूळ जमा करण्यासाठी बीड नगर पालिकेच्यावीने अद्यावत तीन यंत्र आणले आहे. आता बीडकरांची धुळीपासून सुटका होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र हे यंत्रच कोठे धुळखात पडले असल्याने बीडकरांना शहरात मोठ्या धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
बीड शहरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यासाठी खस्ता खात होते. मोठ्या आंदोलनानंतर आणि बीडकरांच्या पाठपुराव्यानंतर शहरातील काही भागात सिमेंट रस्ते करण्यात आले. या रस्त्यावरुन अवजड वाहने सुसाट गेल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही धूळ जमा करण्यासाठी बीड नगर पालिकेने तीन यंत्र आणल्याचा गाजावाज केला. तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना या यंत्राची पुजा केली. तेव्हापासून हे यंत्र धूळखात कुठे पडून आहे. या यंत्राने रस्त्यावरील धूळ एकदाही साफ केल्याचे बीडकरांच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात धुराडा उडत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
व्यापार्यांचे मोठे नुकसान
शहरातील कॅनाल रोड, जालना रोड, सुभाष रोड आदी मुख्य बाजार पेठेत मोठे वाहन भरधाव वेगाने गेल्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. ही धूळ व्यापार्यांच्या दुकानात शिरल्याने त्यांच्या मालाचे मोठे नुकसान होते. याला व्यापारीही मोठ्या प्रमाणात वैतागले आहेत. त्यामुळे धूळ साफ करण्याच्या यंत्राने सिमेंट रोडवरील धूळ साफ करण्याची मागणी होत आहे.