आष्टी (रिपोर्टर)- रुई नालकोल येथील शेख महंमद यांच्या दर्ग्याची जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडप करण्यात आली. या प्रकरणातील दोषी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी आज आष्टीच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदरील हे आंदोलन डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेकांची उपस्थिती होती.
मौजे रुईनालकोल (ता. आष्टी) येथील इनाम जमीन सर्व्हे नं. ७५, ७६, ७७, ८१, ८१/१ एकूण क्षेत्र शंभर एकर जमीन बनावटी खोटे दस्तावेज तयार करून जमीन हस्तांतर करणार्या महसूल प्रशासन व जमीन खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, जमीन पूर्ववत इनामी देवस्थानाच्या नावे हस्तांतरीत करण्यात यावी, या सह इतर मागण्यांसाठी आज आष्टीच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यात आदिनाथ बोडखे, सुरेश बोडखे, गोपीनाथ बोडखे, शेख मुश्ताक यांनी जमीन नावावर केलेली आहे. त्यांचा जमीनीशी कसलाही संबंध नसताना तलाठ्याशी संगनमत करून फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ढवळे यांनी केली. या वेळी आंदोलनात शेख अनिस, शेख चांद, शेख दस्तगीर, शेख हजरत महंमद, शेख गुलाब महंमद, शेख हिना यांच्यासह आदींची उपस्थिती होती.