गेवराई (रिपोर्टर) गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरात चोरीच्या घटनांसह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असताना पुन्हा गेवराई शहरातून एका चार चाकी कारची चोरी झाल्याची घटना मंगळवार रोजी मध्यरात्री घडली असून याच कॉलनीतील सहा महिन्यातील ही दुसरी घटना असून आशा वाढत्या चोरीच्या घटनांमुळे गेवराई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान सात महिन्यामध्ये जिल्हाभरातून 273 गाड्या चोरीस गेल्या आहेत. यातील 54 गुन्हे उघडकीस आले.
गेवराई शहरासह अनेक भागात सतत चोरी-मारामारी खून, दरोडा, आशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी शहरातील सरस्वती कॉलनीतील येथील गणेश नगर भागातून सतीश गाडे यांची स्वीप्ट कारची चोरी झाली होती. या घटनेला सहा महिने लोटून गेले तरी गेवराई पोलिसांना अद्याप या कारचा तपास लागला नाही. तर गेल्या दोन दिवसापूर्वी याच सरस्वती कॉलनीतून धन्यकुमार शिवाजी कोल्हे यांची चक-12 ङत-3591 या क्रमांकाची स्वीप्ट कार घरासमोरून चोरट्यांनी लंपास केली असून एकाच कॉलनीतील सहा महिन्यातील ही दुसरी घटना असून अद्याप पहिल्याच कारचा शोध लागला नसून ही दुसरी घटना घडल्याने या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेवराई शहरासह पोलीस ठाण्यातर्गत अनेक भागात खून, दरोडा, चोरी-मारामारी आशा अनेक घटना घडत असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय तरी असा सवाल उपस्थित होत आसून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे.
तर सतत घडणार्या या घटनेकडे गेवराई पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आसून याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
चोरीच्या घटनांसह गुन्हेगारीतही
वाढ ; पोलिसांची कारवाई मात्र शून्य
गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरात चोरीच्या घटनांसह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असताना गेवराई पोलीस मात्र दलालांचे हस्तक झाल्याचे दिसून येत आहे. गेवराई शहरासह अनेक भागात चोरी- मारामारी, दरोडा व खुन आशा अनेक गंभीर घटना घडत असताना याकडे स्थानिक पोलिसांचे मात्र साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील 36 पैकी 12 कॅमेरे बंद
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाखो रुपये खर्च करून अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देत पोलीस अधीक्षक कार्यालयात वर्ग करण्यात आला होता. यानंतर गेवराई शहरात एकूण 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून गेल्या अनेक महिन्यापासून यातील 12 कॅमेरे बंद असून ते देखभाल दुरुस्तीचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र हे कॅमेरे फक्त दुरुस्ती अभावी बंद असल्याने अनेक भागात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून चोरीच्या घटनेतही वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने हे कॅमेरे तात्काळ चालू करून घ्यावेत अशी मागणी नागरीकांतून होत आहे.