Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home संपादकीय रोखठोक- आभाळाएवढ्या माणसांचा मराठी मुलूख वैचारिक वांझोटा झालाय का?

रोखठोक- आभाळाएवढ्या माणसांचा मराठी मुलूख वैचारिक वांझोटा झालाय का?

लेखाचे शिर्षक पाहुन तळपायाची आग मस्तकाला जातेय का? का इथं ही दुर्लक्ष करून पुढ जायचं ठरवलं. आम्हाला ही संताप आलाय ज्या आाभळाएवढ्या माणसांच्या महाराष्ट्रात जेंव्हा वैचारिकतेला थारा मिळत नाही, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्रातील माणसांना माणुस म्हणून जगण्याची संधी दिली. अबला असलेली स्त्री जिथं ज्या माणसांमुळे कर्तबगार होवू शकली, जिथं ज्या माणसांमुळे शिक्षणाची गंगा वाहत राहिली तिथंच अन् त्याच महाराष्ट्रात सह्याद्रीसारख्या रांगड्या दिलाच्या माणसात आज वैचारिकता संपुष्टात आलीय. आपल्या बाबदादांच्या संस्कारांना आणि संस्कृतींना नख लावण्याचे पाप होतेय असे एक ना अनेक प्रश्‍न केवळ आणि केवळ टिआरपीमुळे एखाद्या महापुरूषांच्या मालीका बंद कराव्या लागत असतील किंवा त्या बंद होत असतील तर यापेक्षा आपला तो कपाळ करंटेपणा काय असेल. सावित्रीज्योती-आभाळाएवढी माणसं ही मालिका केवळ टीआरपी मिळत नाही म्हणून २६ डिसेंबरपासून बंद होतेय. ही महाराष्ट्राच हार नव्हे? महाराष्ट्रात निपजलेल्या सर्वसामान्यातील सर्व सामान्य नागरिकांच्या कानफडात सनसनीत चपराक नव्हे? ज्या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी आपलं उभं आयुष्य महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या विधवत्तेसाठी, उन्नतीसाठी चंदनासारखं झिजवलं त्या महापुरूषांच्या जीवन चरित्राचा आलेख याची देही याची डोळा पाहण्याचा योग प्राप्त होत असतांनाही आम्ही पालते परवेस ही संधी दवडवून माझ्या नवर्‍याची बायको पसंत करत असू तर कपाळावरच्या त्या कुंकवाचे खरच महत्त्व आहे का? वडसावित्री पौर्णिमा दिवशी वृत्तवैफल्य करण्यात आणि सातही जन्मो हाच पती मिळावा यासाठी प्रदक्षणा घालण्यात खरच अर्थ उरलाय का? आज आम्ही जरा जास्तच बोलतोय.

rok thok

परंतू सावित्रीबाई फुलेंचा इतिहास जाणुन घेण्याची संधी मिळालेली असतांना महाराष्ट्राची माती जर हा इतिहास जाणून घेण्यात रस घेत नसेल तर महाराष्ट्रात वैचारिक वांझोटोपण पदोपदी येतय का? हा सवाल विचारावाच लागेल. वृक्ष न धरी पुष्पफळ, काय करील वसंत काळ अस जरी वाटत असलं तरी धडधाकट धडावर शिर असलेल्या दोन पाय आणि दोन हाताच्या माणसांना काय बघायला पाहिजे आणि काय बघू नये ही सांगण्याची वेळ २१ व्या शतकात तुमच्या आमच्यावर येत असेल तर हे दुर्दैव अखंड महाराष्ट्राचं नव्ह काय? साधु, संत, सुफींसह समाज प्रबोधनकार, क्रांतीकारी वैचारिक विद्यापीठांचे स्थान असलेल्या महाराष्ट्रामध्ये आभाळाएवढी माणसं होवून गेली. त्या आभाळा एवढ्या माणसांच्या छत्र छायेखाली आज माणसं नव्हे तर कुत्र्याच्या छत्र्या उगल्या की काय? सावित्रीज्योती फुलेंचा इतिहास हा जाज्ज्वल्य आहे. तळपत्या सुर्यासारखा आहे. जोपर्यंत आकाशात चंद्र, सुर्य अबाधित आहेत तोपर्यंत त्यांचे कार्य अजरामर असणार आहे. परंतू त्या कार्यातून जी दिशा मिळणार आहे ती दिशा घेणारे तुम्ही आम्ही कपाळकरंटे अशा वैचारिक बाबीकडे दुर्लक्ष करत


चोली के पिछे क्या हैं
हे पाहण्यात दंग राहत असून तु चीझ बडी हैं मस्त-मस्त गाण्यावर थिरकत असू तर तुमच्या या वर्तनाला मेरा रंग दे बसंती चोला सुद्धा काहीच करू शकणार नाही. अरे जे गाणे आपण आपल्या आईसमोर म्हणून शकत नाहीत किंवा ज्या गाण्याच्या बोलाचा अर्थ आपण आईला विचारू शकत नाहीत ते गाणे डोक्यावर घेवून उपयोग काय? आज अखंड महाराष्ट्राच्या तरूणाईला आमचा सवाल आहे हिंमत असेल तर स्वत:च्या आईला विचारून पहा चोली के पिछे क्या हैं? विचारू शकाल? आपल्या बहिणी तु चिझ बडी हैं मस्त-मस्त म्हणू शकाल? नाही ना. तरीही अशा गाण्यांना टिआरपी मिळतोच. माझ्या नवर्‍याची बायको अशा मालिका याच महाराष्ट्रातच्या महिला डोक्यावर घेतात मग एक सांगा घरातली कुठलीही स्त्री स्वत:च्या नवर्‍याची दुसरी बायको घरात आणतांना आनंद व्यक्त करते का हो? परंतू मनात अन् वर्तनात दुसरे हे जे वैचारिक धोरण आता होत आहे ते भविष्याच्या वैचारिक दृष्टीकोनाला मोठी बाधा आणणारे म्हणावे लागेल. सावित्रीज्योती फले यांची मालिका या मराठी मुलखामध्ये सुरू झाली तेंव्हा आम्हाला वाटले पुन्हा या महाराष्ट्रात प्रत्येक स्त्री जिजाऊ होईल, सावित्री होईल आणि जन्म घेणारी मुलगीही जिजाऊ सावित्रीच्या कथा ऐकून त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत पुढे जाईल. परंतू केवळ टीआरपी मिळत नाही म्हणून सावित्रीज्योती-आभाळाएवढी माणसं ही मालिका २६ डिसेंबरपासून बंद करावी लागत आहेत. ६ जानेवारी २०२० साली ही मालिका सुरू झाली तेंव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा लखलखता इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात जायला सुरूवात झाला. अनेक लोकांनी या मालिकेला डोक्यावरही घेतले. आता कुठं फुले दांम्पत्यांच्या इतिहासाला धार चढली होती. प्रबोधनाचे चार शब्द कानावर पडणार होते. धर्म मार्तंडांना झणझणीत चपराक पडली जाणार होती. त्या पुर्वीच या टीआरपीच्या जमान्यात महात्मा ज्योती फुले ही मालिका बंद करावी लागतेय ती केवळ आणि केवळ टीआरपीमुळे. महाराष्ट्रात


टीआरपीलाही लाचखोरी
असल्याचे यापुर्वी सिद्ध झाले आहे. आपल्याच वृत्तवाहिनीला जास्तीत जास्त टीआरपी मिळावी यासाठी तथाकथीत वृत्तवाहिन्या जेंव्हा टीआरपी वाढावी म्हणून सर्वसामान्यांच्या घरामध्ये जावून लाच देतात तेंव्हा सज्जन सोजवळ सत्त्याला महत्त्व देणार्‍या महाराष्ट्रातले गिधाड आता सर्वच क्षेत्रात टपून बसल्याचे दिसून येते. अर्णव गोस्वामी याच्या वृत्त वाहिनीविरोधात आणि अन्य दोन-तीन वृत्तवाहिन्याविरोधात टीआरपीत लाचखोरी केली गेली म्हणून महाराष्ट्रात गुन्हेही दाखल झाले आहेत. यातूनच महाराष्ट्रातील प्रेषक वर्गापेक्षा प्रेषकांना काय द्यायचं हे ठरवण्यासाठी आणि प्रेषकांच्या मनात बिंबवण्यासाठी आजचे धर्म मार्तंड कुठल्या थराला जावून पोहचतील हे या टीआरपीच्या लाचखोरीतून उघड झाले आहे. उभ्या आयुष्यात सत्याला आणि सत्त्वाला महत्त्व देणार्‍या महापुरूषांच्या मालिकासाठी टिआरपीच्या लाचखोरीची कधीच गरज पडणार नाही. परंतू महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्या व्यक्तींना निलाजरापणा सोडून द्यावा लागेल. सेक्स, बॉयलर, मारधाड, लफडे याचे चित्रण पाहण्याऐवजी आणि संवाद ऐकण्याऐवजी महापुरूषांच्या कर्तृत्व कर्माचे धडे उघड्या डोळ्याने पाहणे आणि ते गिरवणे हे खर तर हिताचे. सावित्रीज्योती-आभाळाएवढी माणसं या मराठी मालिकेचे मार्गदर्शक, लेखक, अभ्यासक प्रा.हरि नरके आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात,


हा करंटेपणा बोचतो
सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा १९-२० व्या शतकातील समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का? कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं अपत्य असते. प्रस्तुत काळ हा जोती-सावित्रीच्या विचारांना, प्रेरणांना, त्यागाला वा ध्येयवादाला फारसा पोषक नाही. ज्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग त्या दोघांनी केला त्या स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. तेच स्वत:च्या इतिहासाबद्दल, पुर्वजांच्या त्यागाबद्दल, वारशाबदल बेपर्वा आणि बेफिकीर आहेत? बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो.


दर्जेदार कंटेण्ट लोकांना हवाच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत. जे लोक कोणत्याही मालिका बघत नाहीत त्यांना माझी ही पोस्ट लागू नाही.
कदाचित टिव्ही मालिका क्षेत्रातील जाणकारांना, यशस्वी मान्यवरांना माझी ही पोस्ट आवडणार नाही. ग्राहक नेहमीच बरोबर असतो, निवडणुकीत पराभूत होणाराने मतदारांना दोष द्यायचा नसतो, या सुभाषितांची माहिती मलाही आहे.


उंच माझा झोका ही उत्तम मालिका चालते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९३५ नंतर आवरती घ्यावी लागते आणि सावित्री जोती तर मध्येच गुंडाळावी लागते. अशाने या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कोण करील? म्हातारी मेल्याचेही दु:ख आहेच, पण काळ बेदरकारपणे सोकावतोय याचे जास्त दु:ख आहे. काहीजण आम्हाला म्हणाले, टीआरपी नसला तरी मालिका चालू ठेवा. हा भाबडेपणा झाला. व्यवहारात तो चालत नाही. कोणतीही मालिका तयार करायला पैसा लागतो, तो ज्या वाहिनीकडून दिला जातो तिला जाहीरातींद्वारे तो परत मिळत असतो. जाहीराती मिळणे न मिळणे हे सर्वस्वी टीआरपीवरच अवलंबून असते. प्रेक्षकांपासून म्हणजेच टिआरपीपासून फटकून राहून मालिका चालू शकत नाहीत ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे.


गाईने पान्हा चोरावा तशी प्रेक्षकांची या मालिकेबाबतची वागणूक राहिली. तमाम स्त्रियांना, चंगळवादी वंचित-बहुजन, अल्पसंख्यकांना आता सावित्रीबाई आणि जोतीरावांपेक्षा तुंबळ करमणूकीचा बेहद्द मारा करणार्‌या काल्पनिक मालिकांची जास्त निकड वाटत असावी. यावरून मराठी समाजाला स्वतंत्र विचार करायला लावणारे, मूल्यनिष्ठा शिकवणारे काही वाचायचे, बघायचेच नाहीये असे समजायचे काय? आजच्या बर्‌याच मालिका प्रेक्षकांना दैववाद, भ्रामक आणि खोटा इतिहास, फॉल्स ड्रामा, बेगडी कहाण्या दाखवित आहेत. अज्ञानमग्न आणि आत्मनाशउत्सुक बहुजन समाजाला ज्ञानद्रोहाचा अनेस्थेशिया देण्याचं काम त्या करीत आहेत. (यालाही अपवाद आहेत, असतात.. काही उत्तम मालिकाही लोकांनी उचलून धरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे.) दुसरीकडे सनातनी सत्ताधारी, समुहांना विचारहीन, एकसाची, नशेडी, उन्मादी प्राणी बनवण्यासाठीची लस रात्रंदिन टोचित आहेत. आत्ममग्न बहुजन चळवळी आपल्याच मित्रांच्या कमिटमेंट तपासण्यात मश्गुल आहेत. त्या कोमात गेल्याने त्यांना हा उलट्या पावलांचा प्रवास, हे मतलबी वारे दिसतच नाहीत. प्रा.हरि नरके यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. ही खदखद महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांच्या मनातील असेल आणि चिंताही असेल कारण इतिहासाच्या पाऊलखुणा लाभलेल्या या भाग्यशाली महाराष्ट्रात आज कशाला महत्त्व दिलं जातय, काय पाहिलं जातय याचा विचार केल्यानंतर


आत्ममग्न फत्तेलष्कर
इथे पदोपदी दिसून येतात. फेसबुक, ट्विटर, व्हाटसऍप यासह अन्य सोशल साईडवर तुटून पडणारी आजची आमची तरूणाई मुलं-मुली सेल्फीपासून आपल्या वैयक्तिक विचारापर्यंत टिप्पणी करतात. हजारो-लाखो लाईकचा पाऊस पाडला जातो. अभिमानाने हा फोटो मी काढलाय असे म्हटले जाते. एखाद्या फोटोसाठी जीव धोक्यात घातला जातो अन् आमचं हे फेसबुकी फत्तेलष्कर रोज उधळत राहते. कधी-कधी एखाद्यावर अक्षरश: तुटून पडते तर कधी-कधी आत्ममग्न होत मनोरूग्ण कधी होवून जाते हे कळतही नाही. हे सर्व कशामुळे होतं याचा विचार केला तर आपल्या सारखे कपाळकरंटे कोण? हा प्रश्‍न सुद्धा पडून घ्यायची लाज वाटते.

अखंड जगात हिंदुस्तान आणि महाराष्ट्राच असा देश आणि प्रदेश आहे ज्या देशाला आणि प्रदेशाला भूगोलाबरोबर तळपता इतिहास आहे. जगातल्या अन्य देशांना नुसता भूगोल आहे. परंतू आम्ही दळभद्री त्या इतिहासाच्याप पाउलखुणा समजून घ्यायला तयार नाहीत. त्या पाउलखुणांवर जायला तयार नाहीत त्यामुळेच सावित्रीज्योती-आभाळाएवढी माणसं सोनी मराठी या दुर चित्रवाहिणीने सुरू केलेल्या मालिकेला आज हे दिवस पहायला मिळत आहेत. हा मालिकेपुरता विषय नाही हा विषय आहे आमच्या संस्काराचा आणि तोही प्रत्येकाला विचार करायला लावणारा.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...