पाटोदा । सोमीनाथ कोल्हे
पुणे येथून केजकडे जाणार्या इंडिगो गाडीला समोरुन येणार्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. या भिषण अपघातात इंडिगो गाडीतील एकाच कुटुबीयातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 6.45 वाजता पाटोदा शहराजवळ मांजरसुंबा- पाटोदा महामार्गावर घडली. अपघात इतका भयानक होता की इंडीगो गाडी समोरासमोर आयशर टेम्पोच्या खाली घुसल्याने यातील मृतांच्या देहांचे तुकडे तुकडे झाले होते. क्रेनच्या सहायाने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मांजरसुंब्याकडून येणारा आयशर टेम्पो आणि पुण्याहुन उद्याच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे जाणार्या कुटुंबीयांच्या इंडीगो गाडीचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली. अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे ए.पी.आय.चंद्रकांत पवार यांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी मृतदेह दवाखान्यात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आ. बाळासाहेब आजबे यांनी घटनास्थळी भेट दिली.
जीवचिवाडी ता. केज येथील मूळ रहिवासी असलेले रामराव कुटे हे पुण्याला खाजगी कंपनीत नौकरीला होते. गांवाकडे लग्न असल्याने रात्री आपल्या कुटुंबासह पुण्याहुन गांवाकडे इंडीगो कारने निघाले होते. सकाळी पावणे सातच्या दरम्यान मांजरसुंब्याकडून येणार्या आयशर टेम्पो (क्रमांक एमएच-26 बीई 5945) आणि पाटोद्याजवळील बामदळ वस्ती जवळील पुलावर पुण्याहुन येणार्या इंडीगो गाडी (क्रमांक एम.एमच 12 केएन 8761) यांचा समोरासमोर भिषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. त्यामध्ये रामहरी चिंतामण कुटे (वय 40), सुनिता रामहरी कुटे (वय 38,मुलगा), ऋषीकेश रामहरी कुटे (वय 19), मुलगी प्रियंका रामहरी कुटे (वय 16), आकाश रामहरी कुटे( वय 15 वर्ष) सर्व राहणार जिवाची वाडी ता. केज. रामहरी कुटे यांच्या मेव्हण्याची मुलगी राधीका सुग्रीव केदार (वय 9 वर्षं, रा. सारणी सांगवी ता.केज) हे सर्व जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भयानक होता की मृतांच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच पाटोद्यातील युवक नागरिक पत्रकार हे घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती. या भिषण घटनेमुळे जिवाची वाडी या गांवी शोककळा पसरली आहे.