भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाली. कालच आपण अमृत महोत्सव साजरा केला. इंग्रजांना देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वच जाती, धर्माच्या लोकांची एकत्रीत येवून मोठा लढा दिला. दिडशे वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती करण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु झाले. नेहरु हे सोळा वर्ष पंतप्रधान होते. भारतासारख्या मागसलेल्या देशात औद्योगिकरणाशिवाय अर्थिक विकास होणार नाही आणि उद्योगिकरणातून येणारी विषमता टाळायची असेल तर समाजवादाची कास धरावीच लागेल हे नेहरुंनी ओळखले होते. परंतू समाजवादी समाजरचना प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकशाही मार्गाचाच आग्रह धरला पाहिजे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्थित्व असणारी मिश्र अर्थव्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले. मिश्र अर्थव्यवस्था स्विकारली की, समाजवादी अर्थव्यवस्था व उद्योगीकरण या दोन्ही गोष्टी साधता येतील हे नेहरुंनी दाखवून दिले. नेहरु नंतर देशाच्या राजकारणात अनेक बदल झाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अन्य पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशात अनेक चढ उतार पाहावयास मिळाले. राजीव गांधी यांनी नवीन तंत्रज्ञानावर भर दिला होता. राजीव यांनी नवं तंत्रज्ञान आणलं नसतं तर आज आपल्याकडे स्मार्टफोन, सोशलमीडीया इतका विकसीत दिसला नसता. आजचे केंद्रातील सत्ताधारी आपल्याच तोर्यात वावरत असतात. जे काही केलं आम्हीच करत आहोत. पुर्वी काहीच झालं नाही. अशी दिशाभूल करणारी वक्तव्य केली जातात. 2014 पासून देशात विकासाऐवजी विखाराला जास्त खतपाणी घालण्याचं काम होवू लागलं. विखार हा देशाला परवडणारा नाही. अनेक वर्षाच्या लढ्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वातंत्र्य कायम राहावे अशीच पुर्वजांची इच्छा होती. त्या इच्छेला कुणी छेद देण्याचं काम करु नये.
धार्मिक सलोखा
राजकारणी मंडळी धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम करत असतात. यातून त्यांना राजकीय फायदे मिळतात असतात. त्यामुळे जाती, धर्मात भांडणे लावली जातात. काहीं कट्टरवाद्यांना हिंदू राष्ट्राचे स्वप्न पडू लागले. महात्मा गांधी हिंदू राष्ट्राच्या विरोधी होते. भारतात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात म्हणुन ते एक राष्ट्र होऊ शकत नाही असा युक्तीवाद केला जात होता तो युक्तीवाद त्यांनी खोडून काढला. हा देश सर्व धर्माच्या लोकांसाठी आहे. कारण येथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहत आहेत. अनेक धर्म असून देखील ते एकमेकांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. कारण त्यांना राष्ट्रीयत्वाची जाणीव आहे. भारत हा हिंदू देश आहे असे जर कोणाला वाटत असेल तर ते पुर्ण चुकीचे आहे. हिंदूच्या बरोबर ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी, यांनी देखील भारताला आपला देश मानला आहे, ते इतर सर्वांना बांधव मानत आहेत. स्वत:च्या संपुर्ण देशाच्या हितासाठी ते निश्चीतच एकत्र राहतील. ह्या देशातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या पैकी कोणालाही दुसर्या कोणत्याही देशाबद्दल आत्मीयता नाही. त्यामुळे हा देश हिंदूचा आहे तसाच हा देश मुस्लिमांचा आहे. तो ख्रिश्चन, पारशी, जैन इत्यादींचा धर्माच्या लोकांचा देखील आहे. गांधीच्या मते सर्व धर्माची मुलतत्वे सारखीच असतात. उदाहरणार्थ अिंहंसा हे सर्व धर्मात सापडणारे एक सुत्र आहे. त्यामुळे सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येवून त्यांच्या धर्मानूसार समान साध्याकडे जाणारे योग्य मार्ग निवडावेत व स्वातंत्र्य साध्य करावे परंतू कोणत्या ही परस्थितीत परस्परांमधील मतभेद, भांडणे मिटवावीत असे गांधींनी सुचविले आहे. गांधींची अहिंसा जगभरात पसरली, पण देशातील काही कट्टरवाद्यांना गांधींचे विचार मान्य नाहीत, ते गांधीच्या विचारा विरोधात चालत असतात. गांधींचे विचारच समाजाला तारु शकतात याचा विचार केला पाहिजे, त्या दिशेने पावले टाकले पाहिजे. येणारा काळ हा कठीण आहे. लोक थोड्या, थोड्या गोष्टीवर हिंसेची भाषा करतात. हिंसेने कधीच चांगलं घडत नाही. उलट अहिंसेने परिवर्तन घडत आहे. समाजातील सलोखा हा देशासाठी चांगलं वातावरण निर्माण करणारा असतो. सलोखा बिघडला की, वातावरण बिघडतं आणि होत्याचं नव्हतं होतं. त्यासाठी सलोखा बिघडू नये याची काळजी प्रत्येकांनी घेतली तर नक्कीच आपण विचाराच्या उंचीवर जातोल.
निवडणुकीतील वातावरण
लोकशाहीत निवडणुकीला महत्व आहे. आज निवडणुकीला वेग, वेगळे रंग दिले जावू लागले. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत निवडणुकीत पैशांचा खेळ मांडला जावू लागला. पुर्वीच्या निवडणुका आणि आजच्या निवडणुकीत खुप बदल झाला. कुठल्या ही परस्थितीत निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न जो, तो करत असतो. निवडणुकीतील गोलबोट हे चांगलं लक्षण नाही, निवडणुकीतील अनैतिक प्रकाराला खतपाणी घातले जावू लागले. काहींचा निवडणुका जिंकणे हा एकमेव उद्देश असतो. निवडणुकीत ज्या प्रमाणे पैशाचा वापर होतो, तसाच जाती, धर्मांचा देखील वापर केला जावू लागला. लोकांना भुलवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जावू लागले. ‘गरीबी हाटाओ’ ही मोहिम गेल्या अनेक वर्षापासून चालवली जात आहे. निवडणुकीतच गरीबांची आठवण पुढार्यांना येते. ऐरवी गरीबाकडे कुणी पाहत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी गरीबांचा वापर करणं शरमेची बाब आहे. पुढारी धनदांडग्यांना पोसण्याचं काम करु लागले. बडे लोक निवडणुकीत पैशाचा पाऊस पडतात. प्रचारासाठी भींती रंगण्याचे दिवस गेले असले तरी नवं तंत्रज्ञान लोकांच्या हाती आले. प्रचाराच्या दिशा बदलल्या. सोशल मीडीयातून प्रचार केला जातो. प्रचारात विचारापेक्षा विखार दिसून येतो. पातळीसोडून बोललं जावू लागलं. आमदार, खासदर पळवणं हे शौर्याचं काम समजलं जावू लागलं. पक्षनिष्ठा आज एखाद्या कोपर्यात जावू पडली. स्वार्थासाठी पुढारी इकडून, तिकडे जातात. आपल्या विचाराचं आणि पक्षाचं सरकार नसेल तर ते पाडण्याचे जोरदार उद्योग देशात होवू लागले. फोडा,फोडीला वेग आला. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यात ज्या काही राजकीय घडमोडी घडल्या आहेत त्या नितीवान घटना घडल्या आहेत का? यापुर्वीही अशा फोडाफोडीच्या घटना घडलेल्या आहेत. असं नाही की, त्या आताच घडत आहे. सगळ्याच पक्षात वैचारीक अनैतिकता वाढू लागली. राजकारण हा आदर्श घेण्यासारखा असला पाहिजे. आजचं राजकारण हे गटारीतल्या पाण्यापेक्षा ही वाईट झालं आहे. आपण संसदीय लोकशाही स्विकारली, लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीचा वापर होवू लागला. लोकशाहीचा किती मान आणि सन्मान राखला जातो याचं आत्मचिंतन व्हायला हवं.
शेतकरी सधन झाला नाही
शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतीत अनेक बदल झाले. शेतीत नवं तंत्रज्ञान आलं, पण शेतकरी आहे त्याच ठिकाणी आहे. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्याचा विषय गंभीर असतांना त्याचा विचार कुणी करत नाही. आधी राजे, महाराजे, जमीनदार, इंग्रजांनी शेतकर्यांना लुटलं आता राज्यकर्ते शेतकर्यांची पिळवणुक करत आहेत. शेतकर्यांना सोन्याचे दिवस येतील असं स्वातंत्र्यानंतर भाकीत केलं गेलं होतं, ते शेवटी भाकीतच ठरलं. गेल्या दहा वर्षात देशातील हजारो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी आंदोलन करत असतात. आंदोलन करणार्या शेतकर्यांना सत्ताधारी नावे ठेवतात. त्यांची मानहाणी करतात. दिल्लीचं आंदोलन प्रचंड गाजलं होतं. या आंदोलनाची अवघ्या जगात चर्चा झाली होती. दीड वर्षांनंतर हे आंदोलन संपलं होतं. केंद्रातील सत्ताधार्यांना आंदोलन चिरडून टाकायचं होतं, पण शेतकरी आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. कृषी कायदे परत घेल्यानंतरच आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली. स्वतंत्र भारतात शेतकर्यांवर असा जुलूम होत असेल तर हे सरकार शेतकर्यांच्या हिताचे आहे की, मुठभर भांडवलदारांच्या हिताचे? शेतकर्यांना बाजुला ठेवून देशाचा विकास होवू शकत नाही. आधी शेतकर्यांचा विचार करावाच लागेल तेव्हा कुठं देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालू शकते.
आता खरी कसरत
देशात कित्येक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्या प्रश्नांची तात्काळ सोडवणुक केली जात नाही. आदिवाशी बहुल भागात विकास झालेला नाही. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही. कित्येक गावात साधे रस्ते झालेले नाहीत. रस्त्याअभावी लोक पायी प्रवास करतात. काही आदिवाशी भागात मृतदेह खांद्यावर किंवा सायकलवर घेवून जावा लागतो अशी दृष्य नेहमीच पाहावास मिळतात. रोजगारासाठी तरुण स्थलांतर करतात. पण त्यांना रोजगार मिळत नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं वचन देण्यात आलं होतं हे वचन हवेत विरलं. सध्याची अर्थव्यस्था बिकट आहे. महागाईने प्रचंड डोकं वर काढलं. गॅस आणि इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली. आठ वर्षात दुप्टीने महागाई वाढाली. रोजगार घटला आणि महागाई वाढली. शिक्षणाची दुरावस्था आहे. गरीबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळत नाही. खाजकरणामुळे शिक्षणाची वाट लागली. सरकारने आपल्या डोक्यावरील भार कमी केला आणि तो पालकांच्या डोक्यावर टाकला. त्यामुळे गरीबांची मुले शिक्षणातून बाहेर फेकली जावू लागली. गरीब कुटूंबातील मुलगा डॉक्टर होणं ही दुर्मिळ बाब झाली. उच्च शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात तेव्हा शिक्षण मिळतं. खेड्यातील जि.प. शाळांची वाईट अवस्था आहे. देशातील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढला. पैसे दिल्याशिवाय सरकारी कार्यालयात कामे होत नाही. काही ठरावीक लोकाकडे गडगंज संपत्ती आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला. त्यासाठी विशेष काही प्रयत्न होत नाही. भटक्या समाजातील लोकांची भटकंती थांबली नाही. निवार्या अभावी राहणारे लोक भारतात कमी नाही. भुकबळींची संख्या संपलेली नाही. अन्नधान्यांचं उत्पन्न वाढून देखील गरीबांना धान्य मिळत नाही. एकूणच आव्हांनांचा डोंगर उभा आहे. त्या आव्हांनाला तोंड देवून देशाला जगात नंबर एकवर आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासांठी इथली शासन आणि प्रशासन व्यवस्था चांगली असली पाहिजे. फक्त विकास हाच अजेंडा समोर ठेवला तरच देशाच येत्या काळात विकास होवू शकतो नसता. यापेक्षाही वाईट परिस्थिती झाली तर नवल वाटू नये.