स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड (रिपोर्टर): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांचे आंदोलन झाले. परळी तालुक्यातील नागापूर येथील सोळंके कुटुंब गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहे.
जमीनीच्या वादातून सोळंके यांनी अनेकवेळा प्रशासकीय खेटे घातले पण त्यांना न्याय मिळत नसल्याने बाप लेकांनी आत्मदहन करण्याचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. आत्मदहन करण्यासाठी आलेल्या या बाप लेकांना परळी पोलीसांनी ताब्यात घेतले तर लहूजी शक्तीसेना यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. रोजंदारी मजूर सेनेनेही आपल्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन केले. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी समाजसेवकांचे आंदोलन झाले. एकूणच या आंदोलनामुळे काल स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजून गेला होता.
परळी तालुक्यातील नागापूर येथील आश्रुबा सोळंके आणि बाबासाहेब सोळंके यांचा जमीनीचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने पिता पुत्राने काल स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. काल हे दोघे बापलेक सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले असता परळी ठाण्याचे पोलीस कर्मचारी तोटेवाड यांनी बाबासाहेब सोळंके यांना ताब्यात घेतले. त्यांच्या खिशामध्ये विषारी बाटली असल्याचे आढळून आले. लहूजी शक्तीसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. हनुमान नगर मोंढा रोड परिसरातील अवैध लाकडी मशीन बंद करण्यात यावी या मागणीसाठी विलास भिसे यांचे आंदोलन झाले. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शेख समीर शेख अमीन यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले. तसेच रोजंदारी मजूर सेनेच्या वतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. मजूरांना त्यांचा न्याय हक्क देण्यात यावा व त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यात याव्यात अशी मागणी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठीही काही समाजसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये डॉ.गणेश ढवळे सह आदींचा सहभाग होता. एकूणच स्वातंत्र्यदिनी या आंदोलनामुळे नगर रोडचा परिसर गजबजून गेला होता.