विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूचे गुढ वाढले
3 ऑगस्टला मेटेंचा गाडीचा झाला होता पाठलाग
कार्यकर्त्याच्या दाव्याने खळबळ; पत्नी ज्योती मेटेंनी केली सखोल चौकशीची मागणी
बीड (रिपोर्टर) शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांच्या मृत्यूचे गुढ अधिकच वाढत असून 3 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दिशेने येत असताना तब्बल दोन कि.मी. आयशर टेम्पोसह अन्य एका कारने पाठलाग केल्याचा धक्कादायक खुलासा एका कार्यकर्त्याने केला असून या खळबळजनक दाव्यामुळे विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूचे गुढ अधिक वाढले आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.
14 ऑगस्टच्या पहाटे मुंबईतील मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी बीडवरून निघालेले शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. घटना घडल्यानंतर तब्बल एक तास मेटेंना मदत मिळाली नसल्याचे त्यांचा चालक एकनाथ कदम याने याआधीच सांगितले. काल मेटेंच्या पार्थीवदेहावर बीड येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान एक ऑडीओ क्लिप वार्यासारखी व्हायरल झाली आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये मायकर नावाचा कार्यकर्ता याआधी 3 ऑगस्ट रोजीही मेटेंच्या गाडीचा तब्बल दोन कि.मी. पाठलाग केल्या गेल्याचा दावा त्याने केला आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांच्या मते ते आणि विनायक मेटे हे पुण्याच्या दिशेने येत असताना 3 ऑगस्ट रोजी शिखरापूरजवळ एक कार आणि आयशर टेम्पो तब्बल दोन कि.मी. गाडीचा पाठलाग करत होते. कारमधील लोक हात करून गाडी थांबवायला सांगत होते तर आयशर टेम्पो साईड देत नव्हता. या वेळी आपण विनायक मेटेंना ते कुठले कार्यकर्ते आहेत? त्यांचे काय म्हणणे आहे? विचारू, असेही म्हटले होते. मायकरने दावा केला आहे, त्याचबरोबर मेटे यांनी चालकास रात्रीची वेळ आहे, जाऊ दे, त्यांना पुढे जायचे असेल तर असे म्हटल्याचे सांगण्यात येते. या ऑडीओ क्लिपमुळे विनायक मेटेंच्या अपघाताबाबत घातपात की अपघात? अशी शंका व्यक्त केली जात आहे. मेटेंच्या अपघाती मृत्यूचे गुढ अधिकाधिक वाढत आहे. या प्रकरणी गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
ज्योती मेटे यांनीही उपस्थित केली शंका
विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भातील ऑडीओ क्लिप समोर आल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी देखील नुकतीच ऑडीओ क्लिप ऐकली आहे, अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझे देखील बोलणे झाले आहे. त्यामुळे या एकूण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. 3 ऑगस्टला हा प्रकार घडल्याचे अण्णासाहेबांनी सांगितले. गाडीचा अपघात व्हावा, अशा पद्धतीने ओव्हरटेक केले जात होते का? या अपघातामधील आणि त्या गाडीचा काही संबंधत आहे का? याचा तपास झाला पाहिजे. या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.