रिपोर्टर विशेष…
बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ म्हणून काम करणारे शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटेंचा दुर्दैवी अकाली अपघाती निधन झाला. त्यांच्या पार्थीव देहावर स्वातंत्र्यदिनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचे अख्खे मंत्रीमंडळ बीड जिल्ह्याचे सर्व पक्षांचे आजी-माजी आमदार-खासदार उपस्थित होते. विनायक मेटे किती चांगले होते, विनायक मेटेंनी मराठा समाजासाठी काय केले? सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ते कसे बोलत होते. त्यांचा स्वभाव किती चांगला होता, त्यांच्या जाण्याने किती नुकसान झाले. मेटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कसा कोसळला यासह विनायक मेटेंच्या भूत आणि वर्तमानावर मेटेंपासून फायदा असणार्यांपासून मेटेंमुळे नुकसान झालेल्या प्रत्येकाने आपल्या शोक संदेश भाषणात अश्रू ढहाळले, ढसाढसा रडले परंतु शिवसंग्रामच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भविष्याबाबत कोणीच काही मांडले नाही. मेटेंचा परिवार हा आई-वडिल, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी एवढाच नव्हता. नाही, तर मेटेंचा परिवार हा चांद्यापासून बांध्यापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, मराठ्यांपासून मुसलमानांपर्यंत, कष्टकर्यापासून कामगारांपर्यंत, सर्वसामान्यातील सर्वसामान्यांपासून गल्ली ते मुंबई महानगरीपर्यंत प्रचंड विस्तारलेला आहे. या परिवाराचा बाप मेलाय, त्या परिवाराला आधार देण्यासाठी ना देवेंद्र फडणवीसांनी कुठे आश्वासीत केले ना अन्य कुणी शिवसंग्राम परिवाराला पुन्हा छत्र मिळावा म्हणून विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंना राजकीय बळ देण्याबाबत भाष्य केले. परंतु आम्ही भूमिका मांडतोय, बीड जिल्ह्याच्या वतीने रिपोर्टर महाराष्ट्राच्या सत्ताधार्यांना मागणं मांडतोय. शिवसंग्रामच्या भविष्यासाठी कार्यकर्त्यांच्या डोक्यावर छत्र राहावं म्हणून ज्योती मेटेंना विधान परिषदेवर आमदार करा, आमचं हे मागणं ना राजकीय नफ्या-तोट्याचं आहे ना ज्योती मेटे अथवा विनायक मेटे यांचा राजकीय खलिता आहे. आमचं मागणं त्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यावर छत्र उभं राहावं, एवढ्यासाठीच आहे.
कोण होते विनायक मेटे, साधा शेतकरी कुटुंबात जन्मलेला पोरगा. ज्याने आपल्या उभ्या आयुष्यात संघर्ष करताना कधी भाजीपाला विकला, कधी भिंती रंगवल्या, कधी बँकेत मुन्शीची कारकुनी केली, तर कधी स्लीपर चप्पल घालून स्वत:च्या पोटासह कुटुंबाच्या पोट पाण्यासाठी भटकंती केली. मात्र गेल्या चार दशकांमध्ये मेटेंनी आपल्या स्वकर्तृत्वातून मराठा समाजासह मुस्लिम आणि बहुजन समाजासाठी जो लढा उभारण्याचे धाडस निर्माण केले ते अनन्यसाधारणच. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने कधी मुंडेंनी, कधी फडणवीसांनी तर कधी पवारांनी मेटेंचा उपयोग सरळ सरळ एखाद्याची जिरवण्यासाठी केला. मेटे एक असे रसायन होते की, त्या रसायनामुळे मुंडे-फडणवीस-पवारांना कोणी डोकेदुखी ठरत असेल तर ती डोकेदुखी कायमची बंद व्हायची. हे सत्य स्वीकारावं लागेल. मग ते मुंडे असोत, फडणवीस असोत की पवार असोत. राजकारणाच्या कानावर कोणी जात असेल तर त्याला अर्धनग्न करण्यासाठी त्याची पँट कशी उतरवायची हे मेटेंना चांगलं येत होतं. हे दशकभरापूर्वी पवार, मुंडेंना चांगलं माहित होतं. म्हणून दुर्दैवाने गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं तसं फडणवीसांनी मेटेंना हेरलं, अन् मेटे फडणवीसांचे ‘खास’ झाले. मेटेंचं राजकारण हे वैयक्तिक कधीच नव्हतं हे छातीठोकपणे आम्ही काल, आज आणि उद्याही म्हणू. आम्ही तर उघड मेटेंना म्हणायचो, ‘मेटे साहेब, तुम्ही असे आहात, तुम्हाला कसंही फेका चार पावलावर तुम्ही उभे राहताच,’ तेव्हा मेटे म्हणायचे, ‘मला काय मांजर म्हणता काय’, आम्ही म्हणायचोत ‘वाघाची मावशी मांजर आहे, तुम्ही तर वाघ आहात’, कधी कधी वैचारिक भूमिकेतून त्यांचं आणि आमचंही पटलं नाही, आम्ही त्यांच्या एखाद्या भूमिकेला वाघ म्हणून संबोधायचो आणि एखाद्या भूमिकेला सरळ सरळ मांजराची भूमिका म्हणूनही ठणकवायचो. परंतु 30 वर्षांच्या राजकारणामध्ये कधी पवारांनी मेटेंना जिल्ह्यापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत फिरवून घेतले. गोपीनाथ मुंडेंनीही तेच केले आणि आज देवेंद्र फडणवीसही तेच करतात. लोकांना वाटतं, पवार-मुंडे-फडणवीस यांनी मेटेंना ताकद दिली, परंतु खरे तर हे आहे, पवार-मुंडे-फडणवीसांना अंधारातून ताकद देण्याचे काम मेटेंनी केले. ते रस्त्यावर उतरले अन् निवडणुकांमध्ये अशी काही बुमरँग केले, मुंडेंना नको होते ते पडले, फडणवीसांनाही नको ते पडले, पवारांच्या कानावर जाणारे अनेक वेळा मुके झाले. असा खमक्या आणि सर्वसामान्य माणसाविषयी रस्त्यापासून विधी मंडळात आक्रमकपणे डरकाळी फोडणारा हा बीड जिल्ह्याचा वाघ निपचीत पडला. याने मेटे कुटुंबाची जेवढी हानी झाली त्यापेक्षा अधिक हानी महाराष्ट्रातल्या शिवसंग्राम कार्यकर्त्यांची झाली. उभ्या महाराष्ट्राने आणि बीड जिल्ह्याने पाहितलं, मेटे किती मोठे होते. महाराष्ट्राचा इतिहास आहे, जीवंतपणे चांगल्या माणसाला नाव ठेवले जाते, दगडं मारले जातात आणि मृत्यू झाल्यानंतर हेच लोक त्यांच्याच हाताने मारलेले ते दगडे शोधतात अन् त्या दगडांचा पुतळा तयार करतात. मेटेंच्या बाबतीतही तेच घडतय. अंत्यविधीस्थळी आलेल्या मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत, केंद्रीय मंत्र्यांपासून खासदारापर्यंत, आमदारांपासून माजी आमदारांपर्यंत अनेक जणांनी विनायक मेटेंचा भूतकाळ सांगितला. वर्तमानावरही भाष्य केलं. अनेकांनी अश्रू ढहाळले. उपस्थितांचे डोळे पानावेत, हुंदके यावेत असे भाषण केले, तसे वातावरण निर्माण झाले त्या हजारो लाखोंच्या पानावलेल्या डोळ्यात आम्ही उभा राहून पाहितले. फक्त ज्योती मेटे ज्या की, विनायक मेटेंच्या पत्नी आहेत त्यांनी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याला आधार देणारा शब्द उच्चारला, बाकी मेटेंपासून लाभधारी असलेल्या एकाही पक्षाच्या बलाढ्य नेत्यांनी शिवसंग्रामचे भविष्य काय? यावर भाष्य केले नाही. हे आम्ही पहात होतो, आमचे कान फडणवीसांच्या बाबतीत आसुसलेले होते, फडणवीस घोषणा करतील अरे गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपाची एकहाती सत्ता आहे आणि ज्या माणसामुळे महाराष्ट्रात भाजप सत्तेत येण्यास मदत झाली, फडणवीसांना मुख्यमंत्री करणारे अडथळे निपचीत पडले त्या शिवसंग्रामच्या वाघाच्या बछड्यांना सांभाळण्यासाठी ‘ज्योती’ नावाच्या वाघीनीला विधान परिषदेत पाठवू, अन् शिवसंग्रामचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यावर छत्र धरू. परंतु दुर्दैव फडणवीस बोललेच नाही. ज्योती मेटे या काही चुल आणि मुल सांभाळणार्या महिला नाहीत. त्या सुशिक्षित आहेत, नव्हे नव्हे तर उच्च शिक्षीत असून क्लास वन आहेत. प्रशासकीय पातळीवर राज्य हाकणार्या शासन पातळीवर राज्य का हाकू शकणार नाहीत? हा आमचा फडणवीसांना आणि मेटेंच्या प्रत्येक लाभधारकांना सवाल आहे. आम्ही म्हणू, शिवसंग्राममध्ये बोटावर मोजण्याइतके जेकाही मोठे नेते असतील ते स्वत:साठी कुठेही पर्याय शोधतील परंतु दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या फळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय? त्या कार्यकर्त्यांना छत्र देण्या इरादे भारतीय जनता पार्टीने आणि खासकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे ज्योती मेटेंना विधान परिषदेवर घ्यावे, अन् त्या हजारो लाखो महाराष्ट्रातील शिवसंग्राम कार्यकर्त्यांना हक्काचे छत्र द्यावे. मेटे पुन्हा होणे नाही, हे त्रिवार सत्य आहे. मेटेंसारखा माणसं जमा करण्याची दांडगी हाथोटी, मेटेंसारखा राजकारणातला आक्रमकपणा, विषय हाताळण्याची आणि समजून घेत विधीमंडळात मांडण्याची पद्धत अन्य कोणालाही जमणार नाही, मेटे मेटेच होते. हे जेवढे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे तेवढेच मेटेंच्या विचारांवर त्यांच्या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न ज्योती मेटे करतील, हेही आम्ही म्हणू.