घरकुलासाठी खर्या लाभार्थ्याची नावे समाविष्ट करण्याची ग्रामसेवकाला आदेश
बीड (रिपोर्टर) ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना व अटल निवास योजना या चार योजना घरकुलासाठी राबवल्या जातात. गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत पातळीवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘ड’ फॉर्म भरून देण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये तांत्रिक चुकीमुळे 4665 पात्र लाभार्थ्याची नावे वगळली गेली होती. सोबतच ग्रामीण भागात घरकुलचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले काही नावेही/लाभार्थी वगळले गेले होते. या सर्वांसाठी पुन्हा एकदा तांत्रिक चुकीतील वगळलेली नावे आणि काही कारणाने खरे वंचित राहिलेले लाभार्थी यांचा पून्हा एकदा सर्व्हे करावा असे आदेश ग्रामसेवकांना दिले गेले आहेत.
ग्रामपंचायत पातळीवर ज्या घरकुलाच्या योजना राबवतात त्यामध्ये सर्वात मोठी ही पंतप्रधान आवास योजना आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात 35681 लोकांची यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने राज्य शासनाला ऑनलाईन केली होती. त्यातील 4665 लोकांची नावे काही तांत्रिक चुकीमुळे वगळली गेली होती. तर काही खरे खुरे वंचित लाभार्थी स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे वगळले गेले होते. सिस्टीममधले वगळलेले लाभार्थी आणि वंचित लाभार्थी यासाठी पून्हा एकदा ग्रामसेवकाने सर्व्हे करून नमुन्यातील फॉर्ममध्ये हि नावे भरून राज्यशासनाला पाठवावेत असे आदेश 3 ऑगस्टला सर्व गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे गावपातळीवरील वंचित लाभार्थी पून्हा एकदा घरकुल योजनेसाठी पात्र होतील.