बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातली पोलिस यंत्रणेसह अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचार्यांवर शासनाचा अथवा लोकप्रतिनिधींचा म्हणावा तसा प्रभाव नसल्याचे आज विधीमंडळात लागलेल्या प्रश्नावरून दिसून येते. सत्ताधारी भाजपाच्या दोन आमदारांनी आज बीड जिल्ह्यातल्या आरेाग्य विभागाचे आणि पोलिस यंत्रणेचे अक्षरश: वाभाडे काढले. अवैध धंद्यांविरोधात भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा या सातत्याने आवाज उठवत डिवायएसपीजायभाय आणि अंबाजोगाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्याविरोधात सातत्याने लिखीत तक्रारी करूनही सत्तेत असलेल्या भाजपाच्या गृहमंत्र्यांना आपल्याच आमदारांच्या तक्रारीवर आतापर्यंत विश्वास नव्हता. मात्र आज जेव्हा नमिता मुंदडांनी आवाज उठवला तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर आज वादग्रस्त वासुदेव मोरेंचे तडकाफडकी निलंबन करण्याची घोषणा केली. तर वादग्रस्त डिवायएसपी जायभाय यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीची सकाळ बीड जिल्ह्यातल्या महत्वाच्या प्रश्नांनी गाजली. गेवराईचे भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी अवैध गर्भपात आणि लिंगनिदान प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष बीड जिल्ह्याकडे केंद्रीत केले. तर दुसरीकडे काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईचे डिवायएसपी सुनिल जायभाय आणि पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या अवैध धंद्यांबाबतच्या भूमिकेचे लख्तरे विधीमंडळात टांगले. काल वासुदेव मोरे यांची बदलीची घोषणा गृहमंत्री फडणवीसांकडून करण्यात आली. मात्र यावर आमदार समाधानी नसल्याचे आज पून्हा पहावयास मिळाले. नमिता मुंदडांनी हा विषय आक्रमकतेने लावून धरला. सत्तेत असलेल्या भाजपाच्याच आमदाराला आपले सत्य मांडण्यासाठी विधीमंडळात पोटतिडकीने बोलावे लागले. हे पून्हा एकदा आज दिसून आले. अखेर देवेंद्र फडणवीसांनी याप्रकरणी डिवायएसपी सुनिल जायभाय यांची तडकाफडकी बदली केली तर वासुदेव मोरेंची निलंबन करण्याची घोषणा केली. विधीमंडळात सरकारला मुंदडा आणि लक्ष्मण पवार या दोघांनी घरचा आहेर दिला.