काँग्रे्रसच्या भवितव्याबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. देशातील कोणत्या ना कोणत्या राज्यात काँग्रेसला धक्के सहन करावे लागतात. 2014 व 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे. गेल्या आठ वर्षात देशातील ज्या काही राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभेत देखील काँग्रेस हारलेली आहे. आता फक्त बोटावर मोजण्या इतक्याच राज्यात काँग्रेस सत्तेत आहे, हे सत्तास्थान ही भविष्यात राहतं की, नाही असाच प्रश्न पडतो. काँग्रेसला सोडून जाणारांची संख्या वाढू लागली. ज्येष्ठापासून ते तरुण नेते काँग्रेसला सोडचिट्टी देवू लागले. काँग्रेस सोडल्यानंतर नेते काँग्रेसमधील एकाधिकारशाहीच्या बाबतीत बोलत असतात. अनेकांची काँग्रेमध्ये जडणघडण झाली. काहींचा राजकीय जन्मचं काँग्रेसमध्ये झालेला असतांना त्यांना काँग्रेस सोडण्याची वाईट वेळ येणं म्हणजे नेमकं चुकतं कोण याचं आत्मचिंतन पक्षाने केलं पाहिजे.
आझाद यांनी पक्ष सोडला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली. आझाद हे गेल्या काही महिन्यापासून पक्षावर नाराज होते. पक्ष सोडतांना त्यांनी पाच पानी पत्र पाठवून पक्षा पासून फारकत घेतली. पक्षात राहूल गांधी यांच्या ऐवजी त्यांच्या जवळचे लोकच निर्णय घेतात. त्यामुळे पक्षाला उतरती कळा आल्याचा आरोप आझाद यांचा आहे. त्यांचा हा आरोप किती प्रमाणात खरा आणि किती खोटा हे त्यांनाच माहित? आझाद यांना पक्ष आजचं का वाईट वाटला? आझाद हे गेल्या पन्नास वर्षापासून पक्षात सक्रीय आहेत. जेव्हा राहूल गांधी अगदी छोटे असतील किंवा एखाद वेळेस त्यांचा जन्मही झाला नसेल, तेव्हा पासून गुलाम आझाद पक्षात आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि आता सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्या पर्यंत त्यांनी पक्षात काम केले. आज पर्यंत त्यांनी अनेक पदे उपभोगलेले आहेत. त्यांना राजकारणाचा दांडगा अभ्यास आहे. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे. संसदेत त्यांनी अनेक वेळा अभ्यासपुर्ण मांडणी केलेली आहे, ते जम्मू काश्मिरचे असतांना त्यांना दोनदा महाराष्ट्राच्या वाशिम मधून लोकसभेची उमेदवारी दिली होती. यात ते निवडून आले होते. भलेही त्यांच्या पाठीमागे तितकं जनमत नसले तरी त्यांची राजकीय बुध्दीमत्ता चांगली आहे. पक्षाला त्यांच्या अनुभवाची गरज नाही का? की, त्यांना पक्षात राहवेना हेच कळेना? आझाद हे राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर राज्यसभेत त्यांना जेव्हा निरोप देण्यात आला होता. त्यावेळी बरीच ‘रडापडी’ झाली. पंतप्रधान मोदी आणि आझाद यांनी जुन्या कटू आठवणींना उजाळा देवून दोघांचा कंठ दाटून आला होता. संसदेतील या ‘अश्रुची’ देशात चांगलीच चर्चा झाली होती. आझाद आणि मोदी यांचे राजकीय संबंध चांगले आहेत हे समोर आले होते. भविष्यात आझाद भाजपाकडे वळतात की काय अशी चर्चा देखील राजकीय गोटात होत होती. आता आझाद यांनी पक्ष सोडल्याने ते नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा नवा पक्ष आणि भाजपा यांच्यात समझोता झाला तर नवल वाटायला नको, राजकारणात काहीही होवू शकतं. कुणीच एकमेकांचा कायमचा शत्रू नसतो हे राजकारणाचं समीकरण आहे. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी टिकेचा भडीमार सुरु केला. त्यांच्यावरील टिका पाहता. आझाद याचं पक्षासाठी आज पर्यंत काहीच कार्य नव्हतं का?
23 मधले आझाद एक
काँग्रेस पक्षात बदल करा, असं एक खरमरीत पत्र 23 नेत्यांनी काही महिन्यापुर्वी सोनिया गांधी यांना लिहलं होतं. या पत्राने राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती. त्या 23 नेत्यात आझाद हे ही होेते. आपलं म्हणणं सोनिया गांधी यांनी ऐकलं नाही म्हणुन आझाद यांनी पक्ष सोडला की काय? राज्यसभेवर आपली वर्णी लागली नाही याची ही त्यांना सल असावी. कारण आझाद हे मुरब्बी राजकारणी असल्याने राजकारणाशिवाय काहींना स्वस्थ बसता येत नाही. निवृत्ती नंतर काय करावं हाच प्रश्न गुलाब आझाद यांना सतावत असेल म्हणुन त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देवून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा? जम्मू काश्मिरच्या निवडणुका कधी घ्यायच्या हे भाजपाच्या हातात आहे. एखाद वेळेस येत्या काही दिवसात त्या ठिकाणी निवडणुका होवू शकतात. त्यात आझाद आपला पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये येवू शकतात. आझाद यांना जम्मु काश्मिरच्या काही नेत्यांनी पाठबळ दिलं. तेथील जनता त्यांना किती प्रमाणात स्विकारते हे येत्या काळात दिसेल. आझादसह आनंद शर्मा यांनी सुध्दा काँग्रसेला सोेडलं. त्यांची नाराजी होती. आणखी किती पक्षाचे नेते काँग्रेसला सोडणार आहेत? काँग्रेस नेतृत्व एक, एक नेत्यांच्या जाण्याची वाट पाहत तर नाही ना? काँग्रेसमध्ये आवक नाही पण जावक होवू लागली. त्याचा परिणाम पक्षावर पडू लागला.
खंबीर विरोधकाची गरज
काँग्रेसचा इतिहास मोठा आहे. इतिहासातून सध्याची काँग्रेस काहीच बोध घेतांना दिसत नाही. संकटावर मात करुन इंदिरा गांधी यांनी पुन्हा काँग्रेसची सत्ता आणलेली होती. आज नऊ वर्ष झाली, देशात मोदी यांचं राज्य आहे. या नऊ वर्षाच्या कार्यकाळात देशात काँग्रेस पक्ष सक्षम करता आलं नाही याचं नवल वाटू लागलं. पक्ष मजबूत होण्या ऐवजी पक्षातील एक, एक मोहरे गळू लागले. कॉग्रेसला आम्ही हद्दपार करणार असं भाजपावाले पुर्वीपासून सांगत आले. त्याचं म्हणणं खरचं होतयं की काय असं वाटू लागलं? देशाला एका चांगल्या विरोधकांची गरज आहे. असं नितीन गडकरी यांनी नुकतचं म्हटलं आहे. गडकरी हे भाजपाचे असले तरी ते एक चांगले राजकारणी आहेत. गडकरी नेहमीच आपली मते दिल खुलाशपणे मांडत असतात. विरोधक असतांना गडकरी काँग्रेसच्या बाबतीत सकारात्मक विचार करतात. विरोधक म्हणुन काँग्रेस पक्ष चांगली भुमिका का निभावत नाही. सत्ताधार्यांच्या विरोधात रान उठवण्यासाठी कित्येक मुद्दे असतांना काँग्रेस कुठल्याच प्रश्नाबाबत गंभीर नसते. आंदोलन केले तरी छोटे खानी आंदोलन होतं. त्यात कार्यकत्यापेक्षा फक्त नेत्यांचा भरणा जास्त दिसून येत असतो. महागाईने लोक परेशान झाले. बेरोजगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट आठ वर्षात दुप्पटीने बेकारी वाढली. कोविडमध्ये कित्येकांच्या नौकर्या गेल्या. शेतकर्यांच्या अनेक समस्या आहेत. या मुद्दयावर काँग्रेस तीव्रपणे लढा देतांना दिसेना. संसदेत विशेष काही काँग्रेसची भुमिका दिसत नाही. त्यामुळे कार्यकत्यार्ंना काँग्रेस बद्दल तितकं आकर्षण राहिलं नाही. छोटे पक्ष आपला लढा तीव्रपणे लढतात. ममता बॅनर्जी महिला असतांना भाजपाला भारी पडल्या. स्वत:च्या हिंमतीवर त्यांनी आपलं राज्य साबूत ठेवून भाजपाला पाणी पाजलं. ममता नंतर केजरीवाल हे भाजपाशी दोन हात करत आहेत. दिल्ली तर जिंकलीच सोबत पंजाब केजरीवाल यांनी ताब्यात घेवून भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना चांगलाच झटका दिला आहे. केजरीवाल आताचे नेते आहेत, त्यांना कसलाही राजकीय वारसा नाही, तरी त्यांनी राजकारणात मोठी मजल मारली. तसं काँग्रेसचं नाही. काँग्रेस हा बलाढ्य पक्ष आहे. पक्षाचा देशातील प्रत्येक गावात एक, ना एक कार्यकर्ता आहे. असं असतांना काँग्रेसला संघटन वाढवता येत नाही म्हणजे दुर्देवचं म्हणायचं!
आधी पक्ष जोडा
काँग्रेस पक्षाचा कारभार जरा वेगळाच आहे. या पक्षात गांधी घराण्याशिवाय पान हालत नाही. काँग्रेसचा अध्यक्ष आणि पंतप्रधान ही याच पक्षाचा राहिलेला आहे. अध्यक्षपद आता पर्यंत गांधी घराण्या व्यतिरिक्त दोन व्यक्तीकडे राहिले, ते म्हणजे पी.व्ही राव व सिताराम केसरी यांच्याकडे, नाही तर गांधी शिवाय अध्यक्ष झाला नाही. गेल्या एक वर्षापासून अध्यक्ष पद रिक्त आहे. निवड कोणाची करायची हाच प्रश्न पक्षासमोर होता. निवडणुकीच्या पराभवातून राहूल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे हे पद प्रभारी म्हणुन सोनिया गांधी यांच्याकडे आहे. नवा अध्यक्ष कोण असला पाहिजे या बाबत पक्षात उघडपणे चर्चा होत नाही. बहुतांश नेत्याचं म्हणणं आहे की, राहूल गांधी हेच अध्यक्ष असावेत, काहींचं म्हणणं आहे की, गांधी घराण्या व्यतिरिक्त अध्यक्षपद असावे, 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवड होणार आहे. गांधी घराण्या व्यतिरिक्त अध्यक्ष निवडला तरी तो अध्यक्ष स्वतंत्र निर्णय घेवू शकत नाही. अध्यक्षाला गांधी यांना प्रत्येक वेळी विचारावेच लागेल. एखाद्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष लवकर निवडला जात नसेल तर त्याला काय म्हणायंच? राजकारणात काही निर्णय तात्काळ घेतले जात असतात. प्रश्नांचं गांभीर्य ज्यांना समजलं ते राजकारणात यशस्वी होत असतात. ज्यांना काहीच देणं घेणं नाही. उगीच चालवायचं म्हणून चालवायचं असेल तर अशांनी पक्षांची वाढ होत नाही. 7 सप्टेंबर पासून ‘भारत जोडो अभियान’ काँग्रेसने सुरु केलेलं आहे, हे अभियान देशभरात जाणार आहे. पक्षांनी आधी आपलं संघटन मजबूत करुन अभियानाला सुरुवात करायला हवी होती. पक्षातील नेत्यांना जोडण्याचं काम झालं तर देशातील कार्यकर्ते जोडता येत असतात. घरात अंधार असतांना बाहेर काय दिवे लागणार? आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाटचाल करत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे, वाटचाल करत असतांना पाय मजबुत असले पाहिेजे, ते डळमळता कामा नये. कोणते मुद्दे घेवून काँग्रेस भारत जोडो अभियान सुरु करत आहे यावर बरचं काही अवलंबून आहे. काँग्रेसची अवस्था गोंधळलेली आहे. राहूल गांधी यांना पक्षाची कमांड सांभळता येईना. अपयशावर अपयश येवू लागल्याने काँग्रेसचा जनाधार कमी होवू लागला. नवे कार्यकर्ते जोडलेले दिसेना. जे नेते आहेत ते अगदी सुस्तावलेले आहेत. असं असतांना काँग्रेस येत्या निवडणुकीत भाजपाला कसं तोंड देणार? भाजपाला टक्कर देणं म्हणजे आपला पक्ष तितका ताकदीचा असला पाहिजे. भाजपा हा महाबलाढ्य पक्ष झाला आहे. एकुणच काँग्रेसची मरगळलेली अवस्था पाहता. या पक्षाचं काय होणार असचं वाटू लागलं?