महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकारांनी परळीकरांना खदाखदा हसवले!
भर पावसात कार्यक्रमास तुडुंब गर्दी तर 5 लाखावर लोकांनी ऑनलाइन पद्धतीने पाहिला कार्यक्रम
नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात हास्य जत्रा, डेझी शाह आणि माऊलींच्या वारी देखाव्यातील बालकलाकारांच्या सादरीकरणाने पाडली भुरळ
परळी (रिपोर्टर) आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात सोमवारची संध्याकाळ कला-नृत्य आदी अविष्कारांसोबतच हास्याच्या मैफिलीची ठरली. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या, ’गणेशोत्सवात संस्कृती, लोककला, मनोरंजन आदी कार्यक्रमांची परंपरा आहे. परळीत धनंजय मुंडे साहेबांनी जसे सुरेख आयोजन केले आहे, तितके सुरेख आयोजन पुण्यात-मुंबईत सुद्धा होत नाही, त्यामुळे बॉलीवूड पासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी निसंकोचपणे परळीत येऊन आपली कला सादर करत आहेत. मुंडे साहेबांचे हे मोठे कार्य आहे, असेच म्हणावे लागेल. परळीत आम्ही प्रथमच आलो असलो तरी इथले आयोजन व उपस्थितांचा प्रतिसाद पाहून मन प्रसन्न झाले, तेव्हा पुन्हा परळीत बोलवाल तेव्हा आम्ही नक्कीच येऊ.’ महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय टीव्ही विनोदी शो मधील सर्वच कलाकार सोमवारी परळीत अवतरले होते. कार्यक्रमाच्या आयोजन व निमंत्रणाबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीसह सर्वच कलाकारांनी धनंजय मुंडे व नाथ प्रतिष्ठानचे आभार मानले. प्रथमच परळीत आलेल्या या कलाकारांनी आपल्या खास विनोदी शैलीतून एक से बढकर एक विनोद सादर करून उपस्थितांना खदाखदा हसवले. या कार्यक्रमाच्या वेळी परळीत प्रचंड पाऊस होता, त्यात गौरी विसर्जन असूनही मोंढा मैदानातील मंडप महिला व अबालवृद्धांसह गर्दीने तुडुंब भरलेला होता. शिवाय नाथ प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत सुमारे 5 लाख लोकांनी हा कार्यक्रम ऑनलाइन पाहिला.
हास्य जत्रेतील कलाकारांच्या सादरकीकरणातील ब्रेक मध्ये ’जय हो’ सिनेमा फेम अभिनेत्री डेझी शाह हिने आपल्या चमूसह उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्याचबरोबर माऊलींच्या वारीचा देखावा घेऊन मुंबईवरून आलेल्या बालकलाकारांच्या समूहाने अप्रतिम नृत्यातून साकारलेल्या माऊलींच्या भक्ती गीताने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्या बालकांना लाईव्ह कार्यक्रमात बक्षीस देण्याचा मोह अभिनेत्री प्राजक्ताला सुद्धा आवरला नाही.
या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाह सहित, हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी, समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, नम्रता संभेराव, चेतना भट, वनिता खरात, शिवाली परब यांसह वादक अमोर हडकर, सुनील जाधव, आशिष महाडिक, मनोज पवार, पार्श्वगायिका मोनल कडलक, अनुष्का शिकतोडे, निवेदक रेडिओ सिटी फेम महेश दळवी, धनश्री दळवी या कलाकारांची उपस्थिती होती. या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांना अखेरच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवत, जोरदार हसवले.
तत्पूर्वी सर्व कलाकारांचे नारह प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे यांनी स्वागत केले. तर कार्यक्रमाचे उद्घाटन सोनपेठचे नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, नगरसेवक श्रीकांत विटेकर, उपनगराध्यक्ष दिगंबर पाटील, परळीतले डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, राजाभाऊ पौळ, अब्दुल रहमान, कल्पेश राठोड, विलासबापू मोरे, जुगलकिशोर रांदड, योगेश मालपाणी, सुरज मुंडे, दत्ता भांगे, विनोद चमनगुंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.