तहसिल कार्यलयात बैठक घेऊन विविध विभागाचा आढावा; दुपारी जिल्हाधिकार्यांसोबत बैठक
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील सर्वच मंडळात नुकसान झालेले असताना जिल्हा प्रशासनाकडून फक्त तीनच मंडळात 25 टक्के अग्रीम मंजूर केल्याने इतर मंडळावर अन्याय झालेला असून याबाबत आपण स्पॉट पंचनाम्यासह सर्व पुरावे देऊन जिल्हाधिकारी यांना भेटून तालुक्यातील सर्वच मंडळाला 25 टक्के अग्रीम लागू झाला पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले.
येथील गेवराई तहसिल कार्यालयात आ.लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकित पीकविमा, पीक विमा, लंम्पी आजार, नुकसान भरपाई याबाबत विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला तहसीलदार सचिन खाडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सानप, तालुका कृषी अधिकारी वडकूते, मंडळ कृषी अधिकारी खेडकर, संतोष घशिंग, शेतकरी पुत्र डॉ.उद्धव घोडके, जे.डी.शहा, नाना पवार, दादासाहेब गिरी, कु.शीतल साखरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
या बैठकीत आ.लक्ष्मण पवार यांनी उपस्थित अधिकार्यांकडून आपापल्या विभागाचा आढावा घेतला. तर 25 टक्के अग्रीम बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, प्रशासनाच्या चुकीच्या रिपोर्टटिंग मुळे तालुक्यातील फक्त तीनच मंडळाचा यात सहभाग करण्यात आला असून याबाबत थेट स्पॉटवर जाऊन आढावा घेतला असता सर्वच मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून याबाबत आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पुराव्यासह पत्र सादर करून तालुक्यातील सर्वच मंडळात 25 टक्के अग्रीम लागू करण्यासाठी पाठपुरावा करून सर्वच शेतकर्यांना मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पशु बाबत लंपी रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात पसरत असून शेतकर्यांनी याबाबत काळजी घ्यावी, जर जनावरांना काही लक्षणे आढळून आले तर तात्काळ संबधित अधिकार्यांना माहिती द्यावी व आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे. दरम्यान यावेळी लंपी आजाराबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन यांनी माहिती देऊन या आजाराची लक्षणे व काळजी घेण्याबाबत आवाहन केले. गेवराई येथील तहसिल कार्यालयातील बैठक संपन्न झाल्यानंतर ते काही शेतकर्यांची एक समिती घेऊन दुपारी ते जिल्हाधिकारी यांची भेट घेन्यासाठी रवाना झाले होते.