मुंबई (रिपोर्टर) मुंबई उच्च न्यायालयात शिवाजी पार्कवरील शिवसेना व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या मुद्यावर जोरदार युक्तिवाद सुरू आहे. या सुनावणीत शिवसेनेने मैदानाच्या मागणीसाठी शिवसेनेने प्रथम याचिका दाखल केल्याचा दावा करत शिंदे गटाची याचिका धूडकावून लावण्याची मागणी केली. त्यावर कोर्टाने या प्रकरणी पहिला अर्ज कुणी केला? अशी विचारणा केली.
त्यातच मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांना मैदान मिळवण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या प्रकरणातील चूरस वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणी लंच ब्रेकनंतर दुपारी 2.30 च्या सुमारास पुन्हा सुनावणी होणार असून, त्यात न्यायालय कोणता निर्णय देते याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही आहे. याप्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गेली 28 वर्षे ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, त्याच पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान नाकारले होते. दसरा मेळाव्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय पोलिसांनी दिल्याचे कारण पुढे करत पालिकेच्या जी – उत्तर विभागाने दोन्ही गटांना तसे पत्र पाठवून कळवले होते. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने ठाकरे गटाच्या याचिकेला विरोध करणारी मध्यस्थी याचिका केली. यावर आज सुनावणी पार पडली.