भगवानगड दसरा मेळावा कृती समितीची पत्रकार परिषद
बीड (रिपोर्टर) विघ्नसंतोषी राजकीय लोकांमुळे भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाली. मात्र पुन्हा ही परंपरा भगवानगड दसरा मेळावा कृती समिती सुरू करीत आहे. संत परंपरेत जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी श्रेष्ठ असते. भगवानगडाच्या मेळाव्यातून समाजाला दिशा मिळते, समाज एकत्र येतो म्हणून भगवानगडाच्या पायथ्याशी समाजाचा मोठा दसरा मेळावा होणार आहे, मात्र कोणत्याही नेत्याचे भाषण होणार नसून फक्त समाज एकत्र जमणार असल्याबाबत भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला बाबासाहेब सानप, भाजपाचे सिंदखेडराजा प्रवक्ते विनोद वाघ, दादासाहेब मुंडे, शिवराज बांगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या वेळी बोलताना बाबासाहेब सानप म्हणाले की, आम्ही राजकीय जोडे बाजुला ठेवून भगवानबाबांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरू करीत आहोत. ही परंपरा राजकीय लोकांमुळे खंडीत झाली. मात्र आम्ही समाज म्हणून एकत्र येत पुन्हा ही परंपरा सुरू करत आहोत. आमचा दसरा उत्सव हा कोणालाही टार्गेट करण्यासाठी नाही फक्त भगवानबाबांचे भक्त म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय लोकांनी स्वत:च्या स्वार्थापोटी समाज तोडण्याचे काम केले ते आम्ही भगवान गडावर दसरा मेळावा घेऊन समाज जोडण्याचे काम करत आहोत. आम्ही कोणालाही भगवान भक्ती गडावर जाऊ नका, असे म्हणणार नाहीत. मात्र भगवानगडावर या असे सर्वांना सांगणार आहोत. भगवानबाबांवर ज्यांची श्रध्दा आहे त्या सर्वांनी भगवानगडावर ५ तारखेला होणार्या दसरा मेळाव्यासाठी यावे, असे आवाहन करत आहोत. असे म्हणत आम्ही फक्त आणि फक्त समाज जोडण्यासाठी हा दसरा मेळावा घेत आहोत. ज्याला जे समजायचे ते समजा, असेही बाबासाहेब सानप या वेळी म्हणाले.