जागोजागी मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
परळी (रिपोर्टर) सकाळी ग्रामीण भागात दौरा, विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण, लोकांच्या भेटी-गाठी घेऊन ग्रामीण समस्यांवर जिथले तिथेच तोडगा काढण्याची खास पद्धत, पक्षाच्या गट-गण स्तरावर आढावा बैठका, लोक जिथे भेटतील तिथंच जनता दरबार आणि सायंकाळच्या सत्रात विविध सार्वजनिक दुर्गोत्सवात सहभाग, अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आ. धनंजय मुंडे हे सध्या परळीच्या लोकांमध्ये 12-12 तास रमलेले दिसत आहेत.
नवरात्रोत्सवात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून देवीची स्थापना करून 9 दिवस आराधना जाते. परळी शहरातील जवळपास प्रत्येक दुर्गोत्सव मंडळांच्या आरतीच्या ठिकाणी धनंजय मुंडे स्वतः उपस्थित राहिल्याने स्थानिक नागरिक व मंडळांच्या सदस्यांमध्येही मोठा उत्साह संचारताना दिसतो आहे. रविवारी सकाळच्या सत्रात बोधेगाव येथील विकासकामांचे भूमिपूजन, मोहा गणाच्या गावनिहाय बैठका, जनता दरबार इत्यादी आटोपून सायंकाळी धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील 10 ठिकाणच्या दुर्गोत्सव मंडळांमध्ये आरती साठी हजेरी लावली.
यामध्ये नांदूरवेस येथील नांदूरवेस गल्ली दुर्गोत्सव मंडळ, गणेशपार दुर्गोत्सव मंडळ, सप्तशृंगी दुर्गोत्सव मंडळ, संत सावता माळी चौकातील तुळजाभवानी मंदिर, सिद्धेश्वर नगर येथील जय जिजाऊ दुर्गोत्सव मंडळ, गंगासागर नगर येथील संतोषी माता मंदिर, संत नरहरी मंदिर येथील शिवसेना आयोजित दुर्गोत्सव, उखळवेस येथील धनमनादेवी मंदिर या ठिकाणच्या आरतींना श्री. मुंडे उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांनी अक्षता मंगल कार्यालय येथे आयोजित दांडिया उत्सवातही सहभाग घेतला. यावेळी ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांसह महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता व ठिकठिकाणी त्यांनी धनंजय मुंडे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.