आष्टी (रिपोर्टर) महिन्याचा आणि आठवड्याचा पहिला दिवस असताना आष्टी तहसील कार्यालयामध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत तहसीलदार, नायब तहसीलदार हे उपस्थित नव्हते. अन्य कर्मचारीही याठिकाणी दिसून आले नाही, त्यामुळे आपल्या कामासाठी आलेल्या अनेक नागरिकांना ताटकळत राहावे लागले. तहसीलदार, नायब तहसीलदारच आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील तर कर्मचारी काय करत असतील, असा सवाल करत उशिरा येणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आज ऑक्टोबर महिन्यातील कामकाजाचा पहिला दिवस, आठवड्याचाही पहिला दिवस दोन दिवस सुट्टी असल्याने अनेकजण आपले वेगवेगळे कामे घेऊन आष्टी तहसील कार्यालयामध्ये आले होते. मात्र साडेअकरा ते 12 वाजेपर्यंत तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार आणि तहसीलदार हे उपस्थित नव्हते. यातील काही नागरिकांनी व्हिडिओ काढून आष्टी तहसीलच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला. उपस्थित सेविकेला तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याबाबत विचारले असता ते बाहेरगावाहून येत असतात असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकार्यांसह कर्मचारीही याठिकाणी हजर नव्हते. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबली. कार्यालयात उशिरा येणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.