बीड (रिपोर्टर) सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये सतत झालेल्या पावसामुळे काल परत महसूल विभागाच्या पंचनाम्यात बीड जिल्ह्यातील गेवराई, आष्टी आणि माजलगाव या तीन तालुक्यात 1 लाख 71 हजार 253 हेक्टरचे नुकसान झाले असल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यात म्हटले आहे. यासाठी राज्य शासनाकडून 12 कोटी 23 लाख 55 हजार 596 रुपयांची मदत अपेक्षीत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जिरायत, बागायत, फळपिके यांचाही समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम चालू असले तरी कालपर्यंत महसूल विभागाने बीड जिल्ह्यातील गेवराई, आष्टी आणि माजलगाव या तीन तालुक्यात केलेल्या पंचनाम्यामध्ये गेवराईत 1 लाख 24 हजार 166 हे बाधीत शेतकरी आहेत तर आष्टी तालुक्यात 1 लाख 32 हजार 118 शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे आणि माजलगावमध्ये 23 हजार 780 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. एकूण या तीन तालुक्यात 1 लाख 71 हजार 253 हेक्टरवरील पिकांचे नुकसान हे 33 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे, असे प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे. पंचनाम्याचे काम सुरुच असून सतत पडणार्या पावसामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पुर्ण करून शासनाकडून एकूण झालेल्या नुकसानीसाठी मदतीचा अहवाल पाठवला जाईल, असेही या विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.