शंभर रुपयातले तेल, डाळ, साखर, रवा दिवाळी झाली तरी मिळेना
शहरी भागात काही ठिकाणी वितरण, अन्य तालुक्यात तीच बोंब
बीड (रिपोर्टर) गोरगरिाबांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांमध्ये प्रति एककिलो तेल, डाळ, साखर आणि रवा देत असल्याचा डांगोरा राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीपुर्वी लाखो रुपये जाहिरातींवर खर्चून पिटवला असला तरी गोरगरिबांची दिवाळी होऊन गेल्यानंतरही आजपावेत ग्रामीण भागात शिंदे-फडणवीसांच्या आनंदाच्या शिद्याची शिदोरी गोरगरिबांना करता आली नाही. नेकनूर, चौसाळा, पिंपळनेरच्या गोडाऊनमध्ये कुठं रवा, डाळ तर कुठं साखर तेल अशा अर्धवट वस्तू आल्या आहेत. अन्य तालुक्यात शिंदे-फडणवीसांच्या आनंदाच्या शिद्याची तीच बोंब दिसून येत आहे.
राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने गोरगरिबांसाठी शंभर रुपयात तेल, डाळ, साखर, रवा प्रति एककिलो देत असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली. या चार वस्तूंची किट तयार करून पिशवीवर शिंदे-फडणवीसांचे फोटो टाकून ते लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम दिवाळीपुर्वी करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आम्ही गोरगरिबांचे कैवारी आहोत हे दाखविण्यासाठी लाखो-करोडो रुपयांचा जाहिरातींवरही खर्च करण्यात आला. मात्र काल दिवाळी झाली. आज पावेत बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेत मजुरांपर्यंत हा आनंदाचा शिधा पोहचलाच नाही. शिंदे-फडणवीस सरकार छाती पिटून सांगत असले की आम्ही गोरगरिबांची दिवाळी गोड केली मात्र बाजारात भेटणार्या 242 रुपयांच्या साहित्याची शिंदे-फडणवीसांनी शंभर रुपये किंमत ठेवली. परंतु ती गोडधोड करण्याची पिशवीच लोकांपर्यंत पोहचली नाही. बीड तालुक्यातील पिंपळनेर, नेकनूर आणि चौसाळा येथील गोडाऊनमध्ये अर्धवट माल आल्याचे सांगण्यात येते. कुठे डाळ, रवा तर कुठे साखर, तेल तर काही ठिकाणी केवळ शिंदे-फडणवीसांच्या फोटोच्या पिशव्या नाहीत म्हणून वितरण केले जात नसल्याचेही सांगण्यात येते. शिंदे-फडणवीसांनी ऊर बडवून आम्ही गोरगरिबांची दिवाळी गोड करत आहोत, असे सांगितले असले तरी शिंदे-फडणवीसांचा शिधा लोकांच्या घरात पोहचलाच नाही हे त्रिवार सत्य उघड झाले असून शिंदे-फडणवीसांनी केवळ स्वत:च्या जाहिरातीसाठी हा निर्णय घेतला का? असा सवाल आता विचारण्यात येत आहे.