बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हरकतमध्ये आले असून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत करावाई करत आहेत. या कायद्याअंतर्गत कारवाई केलेल्या हातभट्टी दारू विक्रेत्याची हार्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाकांत कस्तूरे यांनी 19 सप्टेंबर 2022 रोजी भास्कर माणिक फड (वय 52, रा.स्नेहनगर, परळी) याच्याविरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. फड यांच्या विरूध्द परळी शहर पोलिसात दारू जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे यासह आदि स्वरूपाचे आठ गुन्हे नोंद आहेत. त्यातील सात गुन्हे न्यायप्रविष्ट असून एक गुन्हा पोलिस तपासावर आहे. सदरील इसम हातभट्टी दारूचा व्यापार करत असल्याने पोलिसांची त्याच्यावर बर्याच वर्षापासून करडी नजर होती. सदर इसमावर यापूर्वी महाराष्ट्र दारूबंद कायद्याअंतर्गत तीन वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीदेखील हा इसम हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवत होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी 28 ऑक्टोबर 2022 रोजी एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारित करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हार्सूल कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्याच्यावर कारवाई केली. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेहरकर, डिवायएसपी स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश चाटे, सपोनि सपकाळ, पो.ना.किशोर गटमळ, पो.ना.विष्णू फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोह अभिमन्यू औताडे यांनी केली.
गुंडगिरी मोडीत काढणार-एसपी ठाकूर
हातभट्टी दारू तयार करून विकणारे, वाळूची चोरटी विक्री करणारे, जिवनावश्यक वस्तूचा काळा बाजार करणारे, दादागिरी, खंडणी बहाद्दर गुंडांवर जास्तीत जास्त एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाया करून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा आमचा प्रयत्न असेल असे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले.