बीड (रिपोर्टर) जिल्ह्याचे भुमिपुत्र आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या दौर्यानंतर बीड जिल्हा रूग्णालयात मोठी सुधारणा होईल. आहे त्यापेक्षा लोकांना चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा बीडकरांना होती. मात्र बीडकरांचा मोठा गैरसमज झाला असून आयुक्त मुंडे यांनी जिल्हा रूग्णालयातील अकरा डॉक्टरांचे डेपोटेशन रद्द केल्याने येथील डॉक्टरांवर मोठा अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. एकूणच आयुक्तांच्या दौर्यानंतर रूग्णांना दर्जेदार सुविधा मिळण्याऐवजी त्यांना अनेक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या दौर्यानंतर डॉक्टरांसह रूग्णांची फजिती होत आहे.
ऐन दिवाळीत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दौरा काढल्याने कर्मचार्यांसह डॉक्टरांना संपूर्ण दिवाळीत जिल्हा रूग्णालयात तळ ठोकून थांबावे लागले. त्यानंतर भरदिवाळीत आयुक्तांनी जिल्हा रूग्णालयाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी चांगल्या कामाचे कौतुक केले नाही मात्र छोट्या छोट्या चुकांवर बोट ठेवून डॉक्टर कर्मचार्यांना झापझापले. तर डेपोटेशनवर असलेल्या अकरा डॉक्टरांचे डेपोटेशन रद्द केले. त्यामध्ये तीन स्त्रीरोग तज्ञ, दोन ऑर्थो, दोन भुलतज्ञ, दोन फिजिशियनसह अन्य डॉक्टर कर्मचार्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे अचानक येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर मोठा ताण पडला आहे. सध्या जिल्हा रूग्णालयात 32 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. याच 32 डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे आरोग्यसेवा कोलमडली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या दौर्यानंतर बीड जिल्ह्याला रूग्णांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी अतिरिक्त डॉक्टरांसह आरोग्य यंत्रणा मिळतील अशा अपेक्षा बीडकरांना होत्या. कारण राज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे हे बीडचे भूमिपूत्र आहेत. मात्र त्यांच्या दौर्यानंतर सर्व काही उलटे झाले.
दोन भूलतज्ञांचे डेपोटेशन रद्द; एक सुट्टीवर
शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात अनेक शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. येथे कार्यरत असलेल्या दोन भूलतज्ञांचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी डेपोटेशन रद्द केले आहे तर एक भूलतज्ञ सुट्टीवर असल्याने जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी एकही भूलतज्ञ उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक शस्त्रक्रियांना उशिर झाला.
प्रसुती, सिझरच्या
रूग्णांचीही फजिती
जिल्हा रूग्णालयात डॉ.सुरेश साबळे यांनी पदभार घेतल्यापासून दर्जेदार सुविधा मिळत आहेत. मात्र आरोग्यआयुक्त तुकाराम मुंडे यांच्या दौर्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा कोलमडली आहे. कारण अचानक तब्बल अकरा वैद्यकीय अधिकार्यांचे डेपोटेशन रद्द झाले. आता 32 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शुक्रवारी प्रसुती वार्डमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत म्हणून नातेवाईक आरडाओरडा करत होते. येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रूग्णांची फजिती झाल्याचे पहावयास मिळाले.