बीड (रिपोर्टर)ः-गेल्या आठवड्यात पालकमंत्री सावे नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यात येवून गेले. आजही पालकमंत्री जिल्हा दौर्यावर येत असून ते पंतप्रधान ग्रामसडक योजना व इतर शासकीय कामाचा आढावा घेणार आहे. आठ दिवसाच्या खंडानंतर पालकमंत्री परत जिल्हा दौर्यावर येतात ही चांगलीच बाब आहे. मात्र बीड जिल्ह्यात शेतकर्यांच्या सोयाबीनची माती झाली असून कापसाच्या वाती झाल्या आहेत तर विमा कंपनीने आपले सर्व्हेर डाऊन करुन आर्थीक उखळ पांढरे करुन घेण्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी बीड यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसानीसाठी 810 कोटीचा प्रस्ताव राज्यसरकारला पाठवला आहे. याबाबत सावे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून शेतकर्यांच्या मदतीचा प्रश्न लवकर मार्गी लावतील का अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.
पालकमंत्री अतुल सावे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यापासून त्यांचा हा तिसरा दौरा आहे. गेल्या आठवड्यात नियोजन विभागाच्या बैठकीसाठी पालकमंत्री दिवसभर बीड मध्ये येवून गेले. आठ दिवसाच्या खंडानंतर पालकमंत्री परत बीडमध्ये येत आहे. ही चांगलीच बाब आहे. पालकमंत्री वारंवार बीड जिल्ह्यात येत राहीले तर प्रशासनावर त्याचा वचकही राहतो. शेतकर्यांचे आणि जनतेचे प्रश्न लक्षात राहतात. मात्र सावे यांनी ही प्रश्न गांर्भीयाने घेवून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. पालकमंत्री सावे हे आज पंतप्रधान ग्रामसडक योजना व इतर योजनांचा आढावा घेणार आहे. पालकमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे ना की नुसते येवून राजकारणाकडे लक्ष देवू नये अशी ही प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.