Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाशहरात कोरोनाचा धोका : ५१ पॉझिटिव्ह

शहरात कोरोनाचा धोका : ५१ पॉझिटिव्ह


जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, आज १२२ चा आकडा
गढीच्या नवोदय विद्यालयात आठ विद्यार्थ्यांना बाधा

बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बीड शहरात कोरोना आता झपाट्याने वाढताना दिसून येऊ लागला आहे. जिल्ह्यात आज तब्बल १२२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये ५१ रुग्ण हे बीड तालुक्यातले आहेत. त्यापैकी बहुतांशी रुग्ण हे बीड शहरातले असून गेवराईच्या जवाहर नवोदय विद्यालयात आठ विद्यार्थ्यांना कोरोनाने ग्रासल्याचे उघड झाले आहे.
आठवडाभरापासून कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आज सकाळी १२ वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार १ हजार २२२ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता यामध्ये ११०० जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला तर तब्बल १२२ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई १६, आष्टी १६, धारूर १, केज १०, माजलगाव २, परळी ४, पाटोदा ४, शिरूर ५, वडवणी १ असा समावेश आहे. बीड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकट्या बीड तालुक्यात ५१ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यातील बहुतांशी रुग्ण हे बीड शहरातील आहेत. एखाद दुसरा रुग्ण हा शहरानजीकच्या खेडे गावातला आहे. बीड शहरात करीमपुरा, धांडेनगर, तुळजाई चौक, भक्ती कन्स्ट्रक्शन, विप्रनगर, बालेपीर, नगर रोड, खडकपुरा, शिवाजीनगर, सावता माळी चौक, मोमीनपुरा, लक्ष्मण नगर, डीपी रोड आदी भागात एक-दोन रुग्ण आढळल्याने शहरात कोरोनाचा विळखा वाढताना दिसून येत आहे तर तिकडे गेवराईमध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून जवाहर नवोदय विद्यालय, गढी येथील १६ ते १९ वयोगटातील आठ विद्यार्थी कोरोना बाधीत आढळून आल्याने गेवराई तालुक्याची ही काळजी वाढली आहे.

सीएस डॉ.गित्तेंनी केली रुग्णालयाची पाहणी
नवीन कोरोना वॉर्ड निर्मितीचे दिले आदेश

बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत असल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी आज कोविड वॉर्डाची पाहणी केली व रुग्णांची वाढती संख्या पाहता नवीन कोरोना वॉर्डची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील स्वच्छता, ऑक्सीजन पुरवठा, ओटू मशिन इत्यादी उपाययोजनांबाबतही त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांच्या समवेत डॉ. जयश्री बांगर, प्रकाश गायकवाड यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!